राऊतांची शिष्टाई ‘निष्फळ’; मावळमध्ये ‘शिवसेना-भाजप’चे जमेना

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये समेट घडवून आणण्यासाठी शनिवारी (दि.30) झालेली बैठकही अयशस्वी ठरली. सेनेचे राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी केलेल्या शिष्टाईनंतरही भाजप नेत्यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने मावळमध्ये युतीचा धर्म धोक्‍यात सापडला आहे. उमेदवार बदलण्याचा भाजपकडून हट्ट कायम राहिल्याने सेना नेतृत्त्व काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. या मतदार संघातून सेनेने खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. थोडीफार ताणाताणी होवून युतीच घोड गंगेत न्हाईल, असे सुरुवातीला वाटत होते. मोदींना पंतप्रधान करावयाचे आहे, या मुद्यावर भाजप नेते आणि पदाधिकारी कामाला लागतील, असे वाटत होते. मात्र भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या अडेलतट्टू भूमिकेमुळे युतीचे त्रांगडे अजूनही कायम आहे.

भाजप आणि शिवसेनेचे मनोमिलन व्हावे आणि दोन्ही पक्षांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा, यासाठी शहरात आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या. मात्र या तीनही बैठका अयशस्वी ठरल्या. यानंतर दोन पावले मागे घेत श्रीरंग बारणे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे घर गाठत प्रचारात उतरण्याबाबत विनंती केली. यानंतरही भाजपने असहकार कायम ठेवला.

उमेदवार बदलण्याच्या मागणीवर ठाम

सेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काम न करण्याचीच ठाम भूमिका आजही भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेने उमेदवार बदलला तरच काम करू अन्यथा असहकार कायम ठेवू, अशीच भूमिका कायम ठेवण्यात आल्याने भाजप अडेलतट्टू भूमिका सोडणार की सेना उमेदवार बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अखेर शनिवारी मुंबईतून सूत्रे हालली आणि संजय राऊत शहरात पोहोचले. एका खासगी हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीराने पोहोचलेले लक्ष्मण जगताप बैठक संपण्यापूर्वीच तेथून निघून गेले. दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले नाहीत अथवा कोणतेही वक्तव्य न केल्यामुळे युतीतील मनोमिलन झालेच नाही, हे स्पष्ट झाले आहे. खासदार संजय राऊत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार निलम गोऱ्हे व स्थानिक मोजक्‍या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेली चर्चा अयशस्वी झाल्याने तसेच संजय राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही स्थानिक भाजप नेत्यांनी महत्त्व न दिल्यामुळे युतीतील तणाव वाढत चालला आहे.

सदिच्छा भेट – नीलम गोऱ्हे

खासदार संजय राऊत आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये आज सदिच्छा भेट झाली. या बैठकीमध्ये राजकीय विषयावर सकारात्मक चर्चा झाली. बैठकीचा तपशील उघड करता येणार नाही, मात्र युतीची चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी दै. प्रभातशी बोलताना सांगितले.

शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांमध्ये ताळमेळ बसत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे, परंतु उघड-उघड न बोलता आपल्या कृत्यातून भाजपचे पदाधिकारी खद-खद दाखवून देत आहेत. विशेषतः भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप कोणत्याही परिस्थितीत झाले-गेले विसरण्यास तयार नाहीत. दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप मावळात “मनोमिलन’ झालेले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)