पिंपरी : शिवसेना- भाजप मनोमिलन नावापुरतेच?

समन्वय बैठकीला आमदारांची “दांडी’ : वैरभाव संपला नसल्याची चर्चा

पूर्वपरवानगीनेच जगताप अनुपस्थित – बापट

शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप बैठकीला अनुपस्थित असल्याबाबत विचारले असता पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, जगताप परवानगी घेऊन बाहरेच्या कामाकरिता गेले आहेत. दोन दिवस अगोदर त्यांनी माझी परवानगी घेतली आहे, अशी सारवासारव केली.

पिंपरी, दि.19 – मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पिंपरी- चिंचवड आणि मावळ मतदार विधानसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनासाठी आकुर्डीत  मंगळवारी (दि.19) समन्वय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हेच अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे मंगळवारीच पिंपरीत मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सकाळी झालेल्या पक्ष कार्यालयातील कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित होते. मात्र, या समन्वय बैठकीला गैरहजर राहिल्याने बारणे-जगताप वैरभाव अद्यापही संपला नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदार संघातील भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.19) आकुर्डीत बैठक झाली. शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे, महापौर राहुल जाधव, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, शिवसेना आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, मावळचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर उपस्थित होते.

आव्हाडांची चौकशी करावी : डॉ. गोऱ्हे

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी असल्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निराधार आरोपामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. आकुर्डीत पत्रकारांशी बोलत होत्या. आव्हाड यांच्याकडे काही पुरावे असल्यास स्वत: न्यायलयात जाऊन तो त्यांनी सिद्ध करावा. सरकारने चौकशी केली नाही, तर त्यांनी स्वत:हून कोर्टाकडे पुरावे द्यावेत, असे मी त्यांना आव्हान देते.

पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघातील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दिलजमाई व्हावी, याकरिता पालकमंत्री गिरीष बापट आणि शिवसेना उपनेत्या डॉ. नील गोऱ्हे यांचा सहभाग असलेली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. हे दोन्ही नेते आप-आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याविषयी “ब्रेनवॉश’ करत आहेत. त्यानुसार मावळ लोकसभा मतदार संघातील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक आकुर्डीत येथे घेतली.

शहराच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ते या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे या बैठकीत वैरभावाचीच चर्चा रंगली होती.

भाजप-शिवसेनेचे युती झाल्यानंतरही आमदार जगताप यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांनासोबत घेऊन खासदार बारणे यांच्या उमेदवारीला उघड-उघड विरोध केला होता. खासदार बारणे यांचे काम करणार नाही, असे जगताप यांचे समर्थक उघडपणे सांगत असल्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात खरोखरीच शिवसेना-भाजपचे मनोमिलन होणार का? याविषयी शंका उपस्थित केली जात होती. मनोमिलन बैठकीला दांडी मारुन आमदार जगताप यांनी सर्व काही आलबेल नसल्याचे दाखवून दिल्याचीही चर्चा रंगत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.