#लोकसभा2019 : काऊंटडाऊन सुरू; मावळच्या निकालाकडे लक्ष

उरले अवघे चार दिवस : उमेदवारांमध्ये धाकधूक, तर्क-वितर्कांना उधाण

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 30 एप्रिल रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यात मतदान झाले. तब्बल 21 उमेदवारांचे भवितव्य त्याच दिवशी मतदान यंत्रात बंद झाले. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आता मतमोजणीद्वारे होणार आहे. गेल्या 18 दिवसांपासून शिगेला पोहोचलेल्या उत्सुकतेमध्ये भरच पडली असून मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. अवघ्या चारच दिवसांवर आलेल्या मतमोजणीमुळे पुन्हा एकदा विजयाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी अतिचर्चेत असलेला मावळ हा लोकसभा मतदारसंघ तब्बल 22 लाख 97 हजार मतदारांचा. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा मतदारसंघ राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा ठरला. मतदारसंघ पुर्नरचनेत 2009 साली निर्माण झालेल्या या मतदारसंघात शिवसेनेने दोनवेळा विजय मिळविल्याने हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता.

प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीकडे सुरुवातीला तगडा उमेदवारच नसल्याने यावेळीही शिवसेना सहजासहजी बाजी मारेल असे असतानाच पार्थ यांच्या उमेदवारीने या मतदारसंघाच्या लढतीमध्ये चांगलीच रंगत आली. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून ते मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत चुरस पहायला मिळाली. आता मतमोजणीमध्ये मतदार राजाने कोणाला कौल दिला हे अवघ्या चारच दिवसांनी स्पष्ट होणार असून 23 मे रोजी दुपारी चार वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

मावळमध्ये चुरशीच्या झालेल्या मतदानामध्ये 2504 मतदान केंद्रात 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी आपला हक्क बजाविला. तब्बल 21 उमेदवार या मतदारसंघात आपले भविष्य अजमावित असून मतदारराजाने कोणाला कौल दिला हे पाहणे रोचक ठरणार आहे. 21 उमेदवारांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार, शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि वंचित बहुजनचे राजाराम पाटील या तिघांमध्ये खरी लढत झाली. उर्वरित 18 उमेदवार आणि नोटाला किती मते पडणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून पनवेल 24, चिंचवड 20 तर उर्वरित प्रत्येक विधानसभेसाठी 14 टेबलवर ही मोजणी होणार आहे. मावळमधील सहाही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी एकाचवेळी होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल तर चार वाजेपर्यंत निकाल हाती येईल, असे सांगण्यात येत आहे.

यांच्या भवितव्याचा होणार फैसला…

श्रीरंग चंदु बारणे (शिवसेना), पार्थ अजित पवार (राष्ट्रवादी), ऍड. संजय किसन कानडे (बसपा), जगदिश उर्फ अय्यप्पा शामराव सोनवणे (क्रांतीकारी जयहिंद पार्टी), जया संजय पाटील (आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडिया), पंढरीनाथ नामदेव पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), प्रकाश भिवाजी महाडिक, मदन शिवाजी पाटील, राजाराम नारायण पाटील (वचिंत बहुजन आघाडी), सुनिल बबन गायकवाड, अजय हनुमंत लोंढे (अपक्ष), अमृता अभिजीत आपटे, नवनाथ विश्‍वनाथ दुधाळे, प्रशांत उर्फ बाबाराजे गणपत देशमुख, बाळकृष्ण धनाजी घरत, राजेंद्र मारुती काटे(पाटील), विजय हनुमंत रंदील, सुरज अशोकराव खंडारे, सुरेश श्रीपती तौर, डॉ. सोमनाथ उर्फ बाळासाहेब अर्जुन पौळ.

संपूर्ण देशाचे लक्ष

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव या मतदारसंघातून आपले नशिब अजमावित असल्याने मतदारसंघाची देशपातळीवर चर्चा झाली होती. या निवडणुकीद्वारे पवारांची तिसरी पिढी राजकारणात पदार्पण करत असल्यानेही या निकालाला महत्त्व आहे. त्याशिवाय पिंपरी-चिंचवडमधून हद्दपारीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या राष्ट्रवादीला “कमबॅक’ची संधीही या मतदार संघातील विजयाने मिळणार आहे.

महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचेही लक्ष

मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये सुरुवातीला चांगलेच रामायण घडले होते. भाजपाने केलेला दावा, त्यानंतर उमेदवार बदलण्याबाबत घेतलेली भूमिका, श्रीरंग बारणे यांना असलेला अंतर्गत विरोध यामुळे युतीच्या मनोमिलनाला उशीर झाला होता. वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर युतीत मनोमिलन झाले होते. मात्र हे मनोमिलन खरेच झाले होते की वरवरचे होते हे मतमेटीद्वारे समोर येणार आहे. भविष्यातील गणिते आणि विधानसभेचे आराखडे याच निकालातून स्पष्ट होणार असल्याने स्थानिकांसह युतीतील वरिष्ठांचेही मावळच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.