मावळ : “घोरावडेश्‍वर’वर आता वनविभागाचा “वॉच’

  • हुल्लडबाजांना वेसण : बेकायदा प्रकारांना बसणार आळा

सोमाटणे – वन्यजीवांचा अधिवास भंग होऊ नये याकरिता वनविभागाने सकारात्मक पाऊल टाकले आहे. शिवभक्‍तांचे श्रद्धास्थान आणि “वन्यजीव राखीव’ असलेल्या घोरावडेश्‍वर डोंगरावरील वनहद्दीत फिरणाऱ्या नागरिक, हल्लडबाजांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बंदी असताना वनजीवांच्या अधिवासाला धोका पोहोचविणाऱ्यांवर वनकायद्यांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वाढत्या अवैध प्रकारावर आळा घालण्यासाठी वनविभाग “वॉच’ ठेवणार आहे. वनखात्याने अंमलबजावणी केल्यास डोंगरावरील वाढत्या बेकायदा प्रकारांना आळा बसणार आहे.

गहुंजे गावच्या हद्दीत असलेले घोरावडेश्‍वर डोंगर असून, या डोंगरावर पुरातण शिवलिंग आहे. येथे श्रावण महिन्यातील सोमवारी यात्रा भरते. तसेच महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होतात. पुरातण काळापासून दर्शनासाठी शिवभक्‍तांची गर्दी होते. डोंगरपायथ्यापासूनच्या पायऱ्या आणि मंदिर हे भाविकांसाठी खुले आहे. मात्र उर्वरित क्षेत्र हे वनविभागाच्या हद्दीत आहे. त्यामुळे वनविभागाच्या हद्दीत येण्यास सक्‍त मनाई आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन, भाविकांबरोबरच काही हुल्लडबाजांची डोंगरावर गर्दी वाढू लागली आहे. हुल्लडबाजीमुळे दिवसेंदिवस अवैध प्रकार घडत आहेत. याशिवाय बेसुमार वृक्षतोड, गुन्हेगारांचे आश्रयस्थान, मुली-महिलांची छेडछाडप्रकरण खुलेआम घडत आहेत. याशिवाय पिकनिक स्पॉट, दारू पार्ट्यां, जुगार अड्‌डा असे अनेक अवैध प्रकार राजरोस सुरू झाले आहेत. घोरावडेश्‍वरवरील वाढत्या अवैध प्रकारांमुळे डोंगरावरील वन्यजीवास धोका निर्माण झाला आहे.

घोरावडेश्‍वर येथील वनक्षेत्रातील जागेत वन्यजीवांची हत्या, अनाधिकृत सुरू असलेली बेसुमार वृक्षतोड, वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच तरूणी, महिलांची छेडछाड प्रकरण बऱ्याचदा उघडकीस येत आहे. याशिवाय काही नागरिकांनी या वनक्षेत्रातील जागेत “ट्रेकिंग’, “पिकनिक स्पॉट’ तसेच जुगार दारू अड्‌डा बनविला आहे. त्यामुळे आणि येथील वनक्षेत्रातील होत असलेल्या शहरीकरणाने वन्य क्षेत्रातील पक्षी, वन्य प्राणी, वृक्ष यांना मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण करीत आहेत.

घोरावडेश्‍वर येथील वनक्षेत्र कायमस्वरूपी नागरिकांसाठी बंद करण्यात आले असताना जर कोणी याठिकाणी किंवा वन्यक्षेत्रामध्ये आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन घोरावडेश्‍वर वनविभाग (मावळ) वनाधिकारी रेखा वाघमारे यांनी केले आहे.

आम्ही रक्षणकर्ते…
घोरावडेश्‍वर वनविभाग (मावळ) वनाधिकारी रेखा वाघमारे आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणारे सदस्य आशिष चांदेकर, रितेश साठे, विशाल बोडके, निखिल कुंभार, टिपू सुलतान, ऋषिकेश शिरसाठ, सिद्धेश मोहिते, आदित्य मोहिते, स्वप्नील कुंभार यांची टीम घोरावडेश्‍वर सुरक्षित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

घोरावडेश्‍वर हे क्षेत्र “वन्य प्राण्यासाठी राखीव’ आहे. या ठिकाणी ससा, मोर, चिमणी, तरस, भेकर यांसह विषारी सापांचा 30 हून अधिक जातींचा अधिवास आहे. मात्र गेल्या काही काळात या भागात गुन्हेगारांचे अड्‌डा झाला आहे. याशिवाय दारू पाट्या, जुगार अड्‌डा सुरू आहे. तसेच अनेक अवैध प्रकार या परिसरात होतात. या सर्व प्रकारांना पायबंद घालण्यासाठी वनविभागाने कठोर पावले उचलली. डोंगरावरील नागरिकांचे वाढते लोंढे पाहात वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. वन्यजीवांचा अधिकास भंग करणाऱ्यास वनजीव कायदांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. याकरिता वनअधिकारी, वनसेवक, निसर्गमित्र मंडळ सहकार्य असेल.
– रेखा वाघमारे, वनअधिकारी, घोरावडेश्‍वर वनक्षेत्र विभाग (मावळ).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.