Maval Election News – मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे. निवडणूक काळात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कामशेत शहर व परिसरात विविध ठिकाणी चेक पॉईंट उभारण्यात आले असून प्रत्येक संशयित वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.या मोहिमेत काळ्या काचा असलेली वाहने, काळी फिल्म लावलेली चारचाकी वाहने तसेच फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे.कामशेत शहर हे अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अवैध धंदे, अमली पदार्थांची वाहतूक किंवा इतर गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मावळात व कामशेतमार्गे इतर भागांत अमली पदार्थांचे साठे येऊ नयेत यासाठीही तपासणी कडक करण्यात आली आहे. महत्त्वाच्या मार्गांवर कडक बंदोबस्त कामशेत शहरातून नाणे मावळ, पवनमावळ, आंदरमावळ, पुणे व मुंबईकडे जाणारे प्रमुख मार्ग असल्याने येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे प्रत्येक वाहनाची तपासणी करून संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन कामशेत पोलिस प्रशासनाने केले आहे.