मावळ : शेतीला पाणीपुरवठ्यासाठी लाच मागणारी सहायक अभियंता “एसीबी’च्या जाळ्यात

  • पवना पाटबंधारे कार्यालयाच्या महिला सहायक अभियंता 90 हजारांची लाच स्वीकारताना अटक

तळेगाव दाभाडे – पवना नदी पात्रातून शेतीला पाणी पुरवठा परवानगी मिळवून देण्यासाठी पवना पाटबंधारे कार्यालयाच्या महिला सहायक अभियंत्याने एक लाख 20 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्या रकमेपैकी 90 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि. 6) सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडले.
मोनिका रामदास ननावरे (वय 31, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) पथकाने अटक केलेल्या महिला सहायक अभियंताचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्याच्या करूंज (ता. मावळ) गावातील शेतीला पवना नदीपात्रातून पाणी परवानगी हवी होती. त्याकरिता तळेगाव दाभाडे येथील पवना पाटबंधारे कार्यालयात वारंवार जात होते.

पाणी परवानगी देण्यासाठी सहायक अभियंता मोनिका ननावरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी करून 90 हजार देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली.

पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक सुनील बिले, पोलीस हवालदार टिळेकर, पोलीस नाईक वैभव गोसावी, चालक पोलीस हवालदार प्रशांत वाळके या पथकाने सापळा लावला. आरोपी सहायक अभियंता मोनिका ननावरे यांना 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करीत आहेत. मावळ तालुक्‍यात अधिकारी व कर्मचारी लाचखोरीच्या जाळ्यात अडकत आहेत. मावळ तालुक्‍याला लागलेली लाचखोरीची कीड कधी थांबणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.