वडगाव मावळ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील बहुतांश प्रस्थापित पुढाऱ्यांनी एकत्र येऊन मला एकटं पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण मावळातील तमाम जनता माझ्या मागे आहे. तुम्ही नेत्यांना घेऊन लढा मी जनतेला घेऊन लढतो, असे खुले आव्हान मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी दिले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजपा- शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांनी वडगाव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्यासमोर श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर पंचायत समिती समोर झालेल्या जाहीर सभेत शेळके बोलत होते. आपल्या २० मिनिटांच्या भाषणात सुनील शेळके यांनी विरोधकांवर आक्रमक पद्धतीने हल्ला चढवला.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते सूर्यकांत वाघमारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर आदी नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदार म्हणजे मेंढरं नव्हे – शेळके
‘धनगर आपल्या बाजूला करा, मेंढरं आपोआप मागे येतात’, या माजी मंत्री मदन बाफना यांच्या वक्तव्याचा सुनील शेळके यांनी खरपूस समाचार घेतला. पुढाऱ्यांच्या सांगण्यावर कोणाच्याही मागे जायला जनता म्हणजे मेंढरं नाही, अशी टिपणी त्यांनी केली. प्रेम असल्याशिवाय जनता कोणाच्याही मागे जात नाही, असे ते म्हणाले.
‘वारकरी सांप्रदाय त्यांना धडा शिकवेल’
कधीही घराबाहेर न पडलेल्या माता-भगिनींसाठी तीर्थयात्रा व सहली काढल्या तर विरोधकांच्या पोटात दुखत आहे. वारकऱ्यांवर आरोप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय वारकरी सांप्रदाय राहणार नाही. मला विरोध करणाऱ्यांनी कधी कुणासाठी एक रुपया देखील खर्च केलेला नाही. मी मात्र सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम करतो, असे शेळके म्हणाले.
Maharashtra Election 2024: राज्यात आता 8272 उमेदवार रिंगणात, अखेरच्या दिवशी 983 जणांची माघार
सर्वपक्षीय नव्हे ‘सर्वपुढारीय’ उमेदवार
विरोधी उमेदवाराचा उल्लेख सर्वपक्षीय असा करण्यात येत असल्याबद्दल सुनील शेळके यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांनी महायुती म्हणून मला पाठिंबा दिला आहे. ते दावा करीत असलेल्या काँग्रेस पक्षानेही त्यांना अजून पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे ते ‘सर्वपक्षीय’ नव्हे तर ‘सर्वपुढारीय’ नेते आहेत, अशी खिल्ली सुनील शेळके यांनी उडवली.
शिवसेना महायुतीचा धर्म पाळणार – खासदार बारणे
आमदार सुनील शेळके यांनी मावळच्या गावागावात विकास पोहोचवण्याचे काम गेल्या पाच वर्षात केले आहे. आपण नेहमीच विकासाला साथ देतो. त्यामुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक महायुती धर्माचे पालन करतील व शेळके यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, अशी ग्वाही खासदार बारणे यांनी यावेळी दिली.