मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच, अभिनेत्री जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटातने सध्या तरी सर्वांनाच वेड लावल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असून, फॅन्सला देखील ही जोडी आवडली आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला असून, रितेश आणि जेनेलिया यांना डोक्यावर घेतलं आहे.
दरम्यान, त्यांच्या या चित्रपटाने आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना देखील चांगलीच भुरळ घातली आहे. नुकतंच रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत ‘वेड’ चित्रपट पाहिला आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली असून, अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचं कौतुक केलं आहे.
आपल्या पोस्ट मध्ये रोहित पवार म्हणतात, “माऊली… ‘वेड’ लै भारी! रितेश देशमुख जी यांनी दिग्दर्शित केलेला ‘वेड’ हा सिनेमा कार्यकर्त्यांसोबत बघण्याचा योग आज जुळून आला. एक हळूवार आणि भावस्पर्शी प्रेमकहाणी रितेश-जिनिलीया या जोडीने खरोखरंच अप्रतिम साकारलीय. त्यांच्या या चित्रपटाला माझ्या मनापासून शुभेच्छा! तुम्हीही अवश्य बघा!” असं रोहित पवार म्हणाले आहेत.