माऊली परतुनी आली अलंकापुरी…!

“माऊलीऽऽ, माऊलीऽऽऽ’च्या जयघोषात पालखीचे स्वागत ः मंदिर परिसरात रमला वैष्णवांचा मेळा

आळंदी – माऊलींची पालखी विठू भेटीसाठी लाखो वैष्णवांसमवेत पंढरीकडे मार्गस्थ झाली होती. तब्बल 31 दिवसांचा प्रवास संपून आज (दि. 27) माऊलींची पालखी अलंकापुरी नगरीत परतीचा प्रवास उरकून दाखल झाली. यावेळी आळंदीकरांनी माऊलींच्या पालखीचे थोरल्या पादुका मंदिरापासून स्वागत करण्यास सुरुवात केली.

पालखी तीन वाजता थोरले पादुका मंदिर येथे विसावली. यावेळी येथील स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना चहा-प्रसादाचे वाटप करण्यात आले. “थोरले पादुका’च्या वतीने अध्यक्ष विष्णू तापकीर आणि सर्व संचालक मंडळांनी स्वागत केले. त्यानंतर पाच वाजता पालखी अखेरच्या विसाव्यासाठी धाकटे पादुका (देवकृपा सर्व्हिस स्टेशन) येथे विसावली. देवकृपा सर्व्हिस स्टेशनचे सर्वेसर्वा प्रकाश काळे आणि मस्के परिवार यांचे वतीने आलेल्या सर्व मानकरी, विश्‍वस्त, आळंदीकर यांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

सायंकाळी साडेपाच वाजता पुन्हा एकदा “पुंडलिक वरदेऽऽ, हरी विठ्ठलऽऽऽ…!’ असा गजर करीत पालखी हजारो वैष्णवांसमवेत आळंदीतील नवीन आणि जुन्या पुलावरून आळंदीच्या वेशीवर दाखल होताच संस्थानच्या वतीने, तसेच आळंदी नगरपालिकेच्या वतीने ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे धार्मिक उत्साही वातावरणात “माउलीऽऽ, माऊलीऽऽऽ’च्या जयघोषात स्वागत करण्यात आले. इंद्रायणीला पूर आल्यामुळे पालखी राम घाटमार्गे मंदिरात न जाता प्रथम आजोळघरी विसावली. तेथे समाज आरती होऊन पालखी माउलींच्या मुख्य मंदिरात नेण्यात आली. पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पादुका मंडपात ठेवण्यात आल्या.

मानकऱ्यांचा सन्मान
उद्या आषाढी एकादशी असल्याने दुपारी तीन ते पाच या वेळेत हजेरी मारुती मंदिरात कीर्तन सेवा होऊन सर्व मानकऱ्यांचा संस्थानच्या वतीने हजेरी झाल्यानंतर यथोचित नारळ प्रसादाचे वाटप करून सन्मान करण्यात येणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. हजेरीनंतर तब्बल 31 दिवस आळंदी ते पंढरपूर व पुन्हा पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणाऱ्या पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.

सर्जा-राजाचा सन्मान
यंदा प्रथमच पालखीला जुंपणाऱ्या सर्जा-राजाचा सन्मान करण्याचा संकल्प सोडला होता; परंतु पालखी विसाव्याकडे न आणल्याने हा कार्यक्रम आता एकादशीच्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. 27) होणार आहे.

धाकटे पादुका विसाव्याची सातशे वर्षांची परंपरा काढली मोडीत
गेल्या सातशे वर्षांपासून पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर आणि परतीच्या प्रवासात पंढरपूर ते आळंदी असा सुरू झाला आहे. देवापासून पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवते त्यावेळेस जाताना व परतीच्या प्रवासात अलंकापुरीत येताना आळंदीच्या शिवेवर (नजिक) म्हणजेच धाकटे पादुका येथे पालखीचा पहिला विसावा असतो, त्यावेळेस प्रथम आरती होऊन पालखी पुण्यनगरीकडे मार्गस्थ होते, मात्र यंदा पावसाचे कारण पुढे करीत चोपदारांनी पालखी विसाव्याच्या ठिकाणी म्हणजेच धाकटे पादुका (देवकृपा सर्व्हिस स्टेशन) येथे आळंदीकडे जाताना उजव्या हाताला न थांबविता डाव्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे क्षणभरच थांबवून पुढे गेली.

सातशे वर्षांची परंपरा चोपदार मंडळींनी मोडीत काढल्याने आळंदीकरांसह भाविकांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी होणारे सर्व विश्‍वस्तांसह आळंदीतील मान्यवरांचे सन्मान सोहळा, भाविकांचे स्वागत हे सर्व कार्यक्रम केवळ पालखी विरुद्ध बाजूला उभी केल्याने अधुरे राहिल्याची खंत प्रकाश काळे यांनी व्यक्‍त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)