पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं तसेच त्यांनी मंदिरा मागील पोलीस खात्याच्या जागेला भेट दिली. शरद पवारांनी मंदिरात जाणं टाळत बाहेरूनच गणपतीला हात जोडल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. मात्र, त्यांनी मंदिरात जाणं टाळत बाहेरुनच गणपतीला हात जोडले. पवार यांनी नॉनव्हेज खाल्ल्यामुळे ते मंदिरात गेले नाहीत असं सांगण्यात आलं. यावरून आता भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी बोलतांना तुषार भोसले म्हणाले,’मौलाना शरद पवारांचा आज जुम्मा होता आणि त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याचं कारण सांगून मंदिरात जायला नकार दिला’असं म्हणत तुषार भोसले यांनी हल्लाबोल केला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘जे पूर्णपणे नास्तिक आहेत, देव धर्माला मानत नाहीत, जे मंदिरात जातीलच कसे. म्हणून मौलाना शरद पवारांचा आज जुम्मा होता आणि त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याचं कारण सांगून मंदिरात जायला नकार दिला. हेच पवारसाहेब इफ्तार पार्ट्या झोडायला मोकळे असतात. ज्यांना दगडूशेठच्या मंदिरात जायला अॅलर्जी झालीय.’ असंही ते वृत्त माध्यमांशी बोलतांना म्हणाले.
दरम्यान, बुधवार पेठेतील श्री गणेश मंदिरामागील 1,790 चौरस फूट जागा ही पोलीस खात्याच्या मालकीची आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पायाभूत सुविधा पुरण्यासाठी या जागेची मागणी केली आहे.