मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्यावर दुबईहून आलेल्या फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक असून आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायचे आहे, अशी मागणी केल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
मातोश्री उडवण्याची धमकी नाही
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानावर दुबईहून फोन आला असून मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे, अशा आशयाची काही वृत्त प्रसिद्ध झाली होती. मात्र याबाबत मंत्री परब यांनी माहिती देताना, दुबईहून मातोश्रीवर चार ते पाच फोन आले. मात्र फोन करणाऱ्या इसमाने मात्रोश्री उडवून देण्याची धमकी दिलेली नाही, असे स्पष्ट केले.
पोलिसांकडून गंभीर दखल
निनावी फोननंतर मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. तसेच सायबर पोलिस या फोन कॉल्सबाबत अधिक माहिती जमवत आहेत. फोन नक्की दाऊद गँगकडून आलाय की कोणी खोडसाळपणा केलाय? या दिशेनेही तपासाची चक्र फिरली आहेत.
याबाबत बोलताना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी, जर कोणी खोडसाळपणा केला असेल तर त्याचीही गय केली जाणार नाही, असं सांगितलं.