मुंबई – लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणारे आणि आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपच्या समीप पोहोचलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबरदस्त प्रभाव असल्याचं दिसून आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी पाटील यांचे मैत्रीचे संबंध असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलं आहे. त्यामुळे, त्यांचे देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शिवसेना सोडल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते सातत्याने बोलताना दिसले आहेत. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालं आहे.
सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी नरेंद्र पाटील पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांत त्यांनी सभाही घेतल्या आहेत. या कार्यक्रमात त्यांचा कल भाजप आणि विशेषत: फडणवीसांकडे असल्याचे दिसून आले आहे. आता त्यांनी चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच हातावर गोंदला आहे.