परवानगी असूनही साहित्य, मजुरांविना बांधकामे बंद

प्रशासनाने सर्वसमावेशक निर्णय घ्यावा; क्रेडाई पुणे मेट्रोची मागणी


बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण

पुणे – सरकारने काही अटी आणि शर्तींसह बांधकाम प्रकल्पांवर काम सुरू करण्याची परवानगी दिली खरी, पण प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती बांधकाम व्यवसायिकांची संघटना असलेल्या “क्रेडाई’ पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली आहे. प्रशासनाने या क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांशी एकत्रित चर्चा करून सर्वसमावेशक तोडगा काढावा, अशी मागणी मर्चंट यांनी केली आहे.

सध्याच्या काळात बांधकाम व्यवसायिकांच्या नेमक्‍या अडचणी समजून घेण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने एक सर्व्हेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) भागातील तब्बल 216 व्यवसायिकांनी भाग घेत आपल्या अडचणी नोंदवल्या. यामध्ये प्रामुख्याने काम बंद असल्याने बांधकाम प्रकल्पांवर वास्तव्यास असणाऱ्या मजुरांमधील अस्वस्थता, बांधकाम साहित्याची उपलब्धता, साहित्य प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचवण्यात येणाऱ्या अडचणी, स्थापत्य, अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या कर्मचारी वर्गाला प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचता न येणे अशा अनेक समस्यांचा समावेश असल्याचे मर्चंट यांनी निदर्शनास आणून दिले.

विविध प्रकारच्या बांधकाम प्रकल्पांवर वास्तव्यास असणाऱ्या मजुरांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. क्रेडाईसारख्या संस्था आणि खासगी विकसक यांनी या कामगारांना किराणा आणि धान्य पुरवण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्य तपासण्यादेखील केल्या. बांधकाम मजुरांना रोजगार मिळणे बंद झाले आणि यामुळे त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ती दूर करून त्यांना रोजगाराविषयी आश्‍वस्त करणे महत्त्वाचे आहे. सरकारी यंत्रणांनी सहकार्य केल्यास बांधकाम प्रकल्पांवर काम करण्याला सुरूवात करता येईल आणि मजुरांच्या मनातील अस्वस्थता दूर होईल. पर्यायाने मजुरांचे स्थलांतर रोखण्यास देखील मदत होईल, असे मर्चंट यांचे म्हणणे आहे.

येत्या काही दिवसांत बांधकाम प्रकल्पांमधील बेसमेंट, रिटेनिंग वॉल, अंडरग्राउंड कामे, वॉटर प्रूफिंग यांसारखी मान्सूनपूर्व कामे होणे गरजेचे आहे. या सर्व कामांसाठी कन्सल्टंट स्टाफ आणि प्रकल्पांवर काम करणारे निरीक्षक (स्पेशल वर्क सुपरवायझर) असणे आवश्‍यक आहे. यांच्या शिवाय वरील कामे होणे शक्‍य नाही. ज्या मजुरांना येथे थांबण्यासाठी अडचणी होत्या ते घरी परतले आहेत. मात्र, जे अद्याप थांबले आहेत त्यांना आता तरी हाताला काम मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्याच्या अनिश्‍चिततेच्या काळात येथे थांबावे की नाही, या विवंचनेमध्ये हे सर्व मजूर आहेत. जर हे मजूर परत आपल्या गावी गेले तर बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसेल, त्यामुळे सरकारने तातडीची पावले उचलत त्यांना आश्‍वस्त करणे गरजेचे आहे.
– सुहास मर्चंट, अध्यक्ष, “क्रेडाई’ पुणे मेट्रो

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.