भावाभावांतच सामना

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकाच घरातील दोन भावांमध्ये सरळ लढत होणार आहे. शिवसेनेकडून ओम राजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. हे दोघे चुलतभाऊ आहेत आणि एकमेकांचे कट्टर विरोधकही आहेत. त्यामुळे इथे एकाच घरातील दोन भाऊ निवडणूक रिंगणात असले तरी त्यांच्यात काटे की टक्‍कर पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. 

उस्मानाबाद लोकसभा मतदरासंघ युतीत शिवसेनेकडे आहे. खरे तर या मतदारसंघात सुरुवातीपासून कॉंग्रेसचा प्रभाव होता. नव्वदच्या दशकात शिवसेनेने प्रथम येथे कॉंग्रेसला पराभूत केले. पण कॉंग्रेसने पुन्हा येथे आपले वर्चस्व निर्माण केले. पण 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेने सलग येथे लोकसभा निवडणूक जिंकली. 2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली.

2014च्या निवडणुकीत मात्र पुन्हा शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी ते निवडून आले होते. पण गेल्या पाच वर्षांतील गायकवाड यांची खासदार म्हणून कामगिरी अगदीच निराशाजनक ठरली. नुसतीच निराशाजनक नाही तर वादग्रस्तही ठरली. त्यामुळेच यावेळी त्यांना डावलण्यात आले असे बोलले जाते. गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला आणि संसदेच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण चांगलीच गाजली. यामुळे गायकवाड यांची प्रतिमा मलिन झालीच पण शिवसेनेच्या प्रतिमेलाही मोठा धक्‍का बसला. शिवाय खासदार म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात गायकवाड यांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. जनतेशी सोडाच पण कार्यकर्त्यांशीही त्यांचा संपर्क नव्हता. त्यामुळे यावेळी त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होतीच. यावेळी गायकवाड यांना उमेदवारी मिळणार नाही याची कल्पना होतीच.

उस्मानाबादमध्ये शिवसेनेत आमदार तानाजी सावंत यांचा गट बराच प्रबळ आहे. तानाजी सावंत गायकवाड यांचे विरोधक आहेत. यावेळी गायकवाड यांना उमेदवारी मिळू नये म्हणून सावंत यांचा गट प्रयत्नशील होता. सावंत यांची “मातोश्री’शीही जवळीक आहे. गायकवाड यांनी खासदार झाल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांसाठी मेळावाही घेतला नाही तिथे जनतेशी संपर्क ठेवण्याची गोष्टच दूरची आहे. तानाजी सावंत यांच्या गटाने ओम राजेनिंबाळकर यांच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केले होते. गायकवाड यांचा गट नाराज असला तरी त्याचा निवडणुकीच्या राजकारणावर फारसा फरक पडेल असे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना वाटत नाही.

ओम राजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबीयांत हाडवैर आहे. 2009मध्ये पद्मसिंह पाटील यांच्या उमेदवारीला ओम राजेनिंबाळकर यांनी कडाडून विरोध केला होता. ओम राजेनिंबाळकर यांचे वडील पवन राजेनिंबाळकर यांची 2006मध्ये मुंबई-पुणे एक्‍सप्रेस हायवे वर दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पवन राजेनिंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांचे चुलतभाऊ. पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे. या खटल्याची सुनावणी सध्या शेवटच्या टप्प्यावर आहे.

ओम राजे निंबाळकर यांनी 2009च्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर 2014मध्ये राणा पाटील यांनी ओमराजेंचा पराभव केला होता. आता हे दोन्ही चुलतभाऊ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या दोघांमधील चुरस अटीतटीची होणार यात शंका नाही.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तीन, शिवसेनेकडे एक आणि कॉंग्रेसकडे दोन जागा आहेत. तर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ओम राजेनिंबाळकर यांनी तेरणा सहकारी कारखान्याचा भंगार विकून कारखाना बंद पाडला असा आरोप त्यांच्यावर केला जातो. त्याचबरोबर रवीद्र गायकवाड यांच्याबद्दल नाराजी असली तरी त्यांना डावलल्यामुळे त्यांचे नाराज समर्थक शिवसेना उमेदवाराच्या विरोधात काम करू शकतात अशी भीतीही व्यक्त होत आहे.

ओम राजेनिंबाळकर यांना शिवसेनेबरोबरच भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळणेही आवश्‍यक आहे. कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एकत्रित प्रचारसभेचा सकारात्मक परिणाम सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांवर झाला तर मतभेद बाजूला ठेवून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना सहकार्य करतील.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला कॉंग्रेसची साथ आहे. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. अर्थात ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर राणा जगजितसिंह यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यातून इतर कोणत्याही कारणापेक्षा भावनिक कारणांवरच या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा विचार दोन्ही बाजूंचा आहे हे स्पष्ट दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.