fbpx

#IPL2020 : प्ले-ऑफसाठी पंजाबला विजय आवश्‍यक

आबूधाबी – आयपीएल स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबला प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्यासाठी जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याउलट राजस्थानसाठी या सामन्यातील खेळ त्यांची प्रतिष्ठा वाचवू शकतो. 

येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज यशस्वी होतात हा इतिहास असल्याने जोफ्रा आर्चर, टॉम कुरेन यांच्याकडून राजस्थानला अव्वल कामगिरीची अपेक्षा राहणार आहे. यांच्यासह फिरकी गोलंदाज राहुल तेवतिया व रियान पराग यांच्याकडून भेदक गोलंदाजीची अपेक्षा आहे. यंदाच्या स्पर्धेत राजस्थानकडे बलाढ्य खेळाडू असतानाही त्यांना संमिश्र यश मिळाले.

संजू सॅमसन अत्यंत भरात असूनही महत्त्वाच्या सामन्यांत त्याला व कर्णधार स्टिव्हन स्मिथ यांना आलेले अपयश त्यांना भोवले आहे. यशस्वी जयस्वाल व रॉबिन उथप्पा यांनीही साफ निराशा केल्यामुळे त्यांना प्ले-ऑफ गटातही स्थान मिळू शकलेले नाही. त्यांच्या संघात मधल्या फळीत तेवतियादेखील काही सामन्यांत अपयशी ठरल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्याही उभारता आलेली नाही.

पंजाबवर वर्चस्व राखायचे असेल तर मोठ्या धावसंख्येला पर्याय नाही. तेवतिया व पराग यांनी काही सामन्यांत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला असला तरीही त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. एकीकडे राजस्थान पहिल्या पाच फलंदाजांच्या जोरावर यश अपेक्षित करत आहे तर दुसरीकडे पंजाबने सलग विजयांची मालिका कायम राखली आहे. त्यांना या सामन्यातील विजयासह सलग सहा सामने जिंकत प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्याची नामी संधी मिळालेली आहे. राजस्थानच्या गोलंदाजांना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल, ख्रिस गेल, मयंक आग्रवाल व निकोलस पूरन यांना रोखावे लागणार आहे.

ग्लेन मॅक्‍सवेलचे अपयश जरी त्यांना सतावत असले तरीही त्याने गोलंदाजीत ब्रेक-थ्रू मिळवून दिल्याने त्याच्या फिरकीसमोर राजस्थानचे फलंदाज कशी कामगिरी करतात यावरच त्यांचे यशापयश अवलंबून राहणार आहे. पंजाबची गोलंदाजी देखील राजस्थानपेक्षा भेदक आहे. प्रमुख गोलंदाज महंमद शमी याने सुरुवातीला तसेच अखेरच्या षटकांत सातत्याने सरस कामगिरी केली आहे. त्याला साथ देताना फिरकी गोलंदाज मुरुगन अश्‍विन व रवी बिष्णोई यांनी प्रत्येक संघांच्या प्रमुख फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे.

त्यांच्या गोलंदाजीसमोर सॅमसन, स्मिथ व अन्य फलंदाज यशस्वी ठरले तरच त्यांना विजयाची आशा आहे. यंदाच्या स्पर्धेत पंजाबने सुरुवातीला सरस खेळ केला होता. मात्र, त्यांना त्यानंतर काही सामने गमवावे लागले होते व गुणतालिकेत तळातील स्थानावर समाधान मानावे लागत होते. मात्र, ख्रिस गेल त्यांच्यासाठी लकी ठरला. त्याचा संघात समावेश केल्यानंतर पंजाबने सलग पाच सामने जिंकत गुणतालिकेत झेप घेतली व अंतिम चार संघात स्थान मिळवताना प्ले-ऑफमधील स्थानावर दावेदारी भक्कम केली.

पूरन, गेल निर्णायक ठरणार 

राजस्थानच नव्हे तर यंदाच्या स्पर्धेत निकोलस पूरन व ख्रिस गेल यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. अनेकदा पहिले चार फलंदाज बाद झाल्यानंतरही त्यांनी पंजाबला सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्याचे मोठे आव्हान राजस्थानसमोर राहणार आहे. हा सामना जिंकून यंदाच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा विश्‍वास पंजाबचा कर्णधार राहुलने व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.