महाराष्ट्रातील मस्तवाल हैदोस थांबला….

शिवसेनेची सामनातून आजही भाजपवर टीका

मुंबई : महिन्याभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन झाले. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळले. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्‍चित झाले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीस सरकार पळून गेले. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याही सरकारची आणि राजकीय पक्षाची झाली नव्हती. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस संपला असून आता सर्व शुभ घडेल असे म्हणत भाजपावर निशाणा साधला.

सगळ्यांच्या वल्गना हवेतच विरल्या. शेवटी देवेंद्र फडणवीसांचे औटघटकेचे राज्य विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच कोसळले. ज्यांच्या पाठिंब्यावर फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला त्या अजित पवार यांनी सगळयात आधी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व अजित पवारांच्या पाठीशी दोन आमदारही उरले नाहीत हे पक्के झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनाही जावे लागले. भ्रष्ट आणि बेकायदा मार्गाने महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले सरकार फक्त 78 तासांत गेले, असे म्हणत शिवसेनेने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

राजीनामा सत्रानंतर शिवसेनेने सामनामधून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. बहुमताचा आकडा नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा गुन्हा असून ज्यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली त्या अजित पवारांवरील भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे चार तासांत मागे घेतले, हा दुसरा गुन्हा, असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. सभागृहाबाहेर बहुमताने केलेला हा पराभव असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.