काबुल – काही दिवसांपूर्वी काबुल विद्यापिठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मास्टर माईंडला अफगाणिस्तानच्या फौजांनी अटक केली आहे. अफगाणिस्तानचे प्रथम उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली.
अफगाण फौजांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव अदिल असे असून तो पंजशीर प्रांतातील रहिवासी आहे. त्याने तीन वर्षे शरीया कायद्याचा अभ्यास केला आहे. त्यानंतर हक्कानी नेटवर्कचा सदस्य असलेल्या सनाउल्लाहने अदिलला दहशतवादी गटामध्ये भरती करून घेतले होते.
भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा
अफगाणिस्तान सरकारार दबाव आणू शकणाऱ्या कारवाया करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली गेली होती, असे या संशयिताने कबूल केले आहे. काबुल विद्यापिठावरील हल्ल्यासाठी खोस्त प्रांतातून हक्कानी नेटवर्ककडून शस्त्रे मिळाल्याचेही त्याने कबुल केले आहे.
काबुल विद्यापिठावर प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या प्रत्येक हल्लेखोराला एकापेक्षा अधिक नावांनी ओळखले जात होते. हिज्ब-उल-तहरीर, तालिबान अथवा दाईश यासारख्या संघटनांशीही त्यांचे संबंध असायचे, असेही उपाध्यक्ष सालेह यांनी सांगितले.
या हल्ल्यामध्ये किमान 22 जण ठार झाले होते. तर अन्य डझनभर जण जखमी झाले होते. हा हल्ला करणारे तिन्ही दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून ठार केले होते. दाईश (इसिसचे आणखी एक नाव) या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली, तरी या हल्ल्यामागे तालिबान असल्याचा दावा अफगाण सरकारने केला आहे. तालिबानने मात्र या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे.