ठाणे : भिवंडी शहरातील ठाणगे आळी परिसरात गुरुदेव शॉपिंग प्लाझा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. कॉम्पेल्समधील एका कोचिंग क्लासेसमध्ये ही आग लागल्याने खळबळ उडाली होती. कारण, या कोचिंग क्लासमध्ये मुले शिक्षण घेत होते. आग लागल्याची घटना घडल्यानंतर कोचिंग क्लासमध्ये 7 ते 8 मुलं अडकली होती, त्यामुळे कोचिंग क्लास आणि स्थानिकांनी धावाधाव केली.
स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या आगीच्या दुर्घटनेत विद्यार्थ्यांना आपले शालेय साहित्य व दफ्तर तिथेच सोडून बाहेर पडावे लागले. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या होत्या, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
आगीचे कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीची घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. आगीच्या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत.