वर्धा : वर्धा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भूगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. कंपनीत कुलिंग प्रोसेसचे काम सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. या स्फोटात 17 कामगार जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेतील गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
स्थानिकांनी व अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केल्याचं दिसून आलं. या दुर्घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.