आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरीत शनिवारी समाजहिताचा आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देणारे भव्य ‘इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान’ उत्साहात पार पडले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय हिंदू संग्राम सेनेच्या वतीने आयोजित या अभियानात हजारो स्वयंसेवक, युवक, महिला, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवला. पहाटेपासूनच इंद्रायणी घाट परिसरात स्वयंसेवकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. “स्वच्छ नदी, निर्मळ आळंदी”चा संदेश देत नागरिकांनी हातात फावडे, टोपल्या, झाडू आणि स्वच्छता साहित्य घेऊन नदीपात्रात उतरून स्वच्छता मोहीम राबवली. संपूर्ण घाट परिसरात सामाजिक बांधिलकीचे आणि पर्यावरणप्रेमाचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. या अभियानादरम्यान इंद्रायणी नदीपात्रात साचलेली जलपर्णी, प्लास्टिक कचरा, विसर्जित मूर्ती, जीर्ण कपडे, मातीची मडकी, धार्मिक पूजेचे साहित्य आणि इतर टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणावर बाहेर काढण्यात आल्या. नदीकाठावरील गाळ, राडारोडा आणि कचरा हटवण्यासाठी जेसीबी मशीनचाही वापर करण्यात आला. अनेक स्वयंसेवकांनी थेट नदीपात्रात उतरून स्वच्छतेचे काम केले. तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य जपणे, जलसंवर्धनाचा संदेश देणे आणि भावी पिढीसाठी स्वच्छ पर्यावरण निर्माण करणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. इंद्रायणी नदी ही केवळ जलवाहिनी नसून वारकरी संप्रदायाची श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे तिचे जतन आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाचे विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण मोहिमा राबविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. सामाजिक परिवर्तनाचीही जोड विशेष म्हणजे या मोहिमेत केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित विचार न ठेवता सामाजिक जनजागृतीलाही महत्त्व देण्यात आले. व्यसनमुक्तीचा संदेश देणारे फलक हातात घेऊन युवकांनी “नशा असावी प्रगतीची, दारू-गुटख्याची नव्हे” तसेच “तुमचा दृढ निश्चय हाच दुर्व्यसनमुक्तीवर विजय” अशा घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले. त्यामुळे या अभियानाला सामाजिक परिवर्तनाचीही जोड मिळाली. आळंदी नगरपरिषद, विविध सामाजिक संस्था, स्थानिक व्यापारी, वारकरी मंडळी आणि ग्रामस्थांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. अनेकांनी स्वयंप्रेरणेने पिण्याच्या पाण्याची, अल्पोपहाराची आणि स्वच्छता साहित्याची व्यवस्था केली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. हेही वाचा : Pune District : पुणे जिल्ह्याला अमली पदार्थांचा विळखा; स्वाभिमानी संघटनेकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन