नवी दिल्ली – करोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चा सुरू झाल्या असताना आणि काही ठिकाणी रूग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्यांनी जे काही निर्बंध शिथिल केले होते ते पुन्हा लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यात मास्कला अग्रक्रम देण्यात आला आहे.
दिल्ली या केंद्रशासीत प्रदेशात वाढत्या करोना मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे बंधन घालण्यात आले असून मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
दिल्ली पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये लखनौ, गौतमबुद्ध नगर, गाझियाबाद, हापुड, मेरठ, बुलंदशहर, बागपत या सहा एनसीआर जिल्ह्यांमध्ये मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. दक्षिणेत केरळमध्येही मास्कसक्ती लागू झाली आहे. मास्कसक्तीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कर्नाटकमध्ये मास्कसोबतच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्यात आली असून शासकीय जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. पंजाब, तेलंगणा आणि केंद्रशासित चंदिगढ येथेही पुन्हा मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तेलंगणात महिनाभरापूर्वीच मास्क न वापरण्याची मुभा देण्यात आली होती.