वॉशिंग्टन- मास्क घालणारे नागरिकांनाही करोनाचा संसर्ग होतो, असे वादग्रस्त वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. मियामी येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवीन वाद उफाळण्याची चिन्ह आहेत.
खरंतर काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाली होती. मात्र यातून ते बाहेर आले. 26 सप्टेंबरला व्हाइट हाउसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क घातले नव्हते. असे असूनही ट्रम्प यांनी आता मास्क घालणाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची 26 सप्टेंबरच्या कार्यक्रमानंतरच करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या कार्यक्रमात आलेल्या अनेक पाहुण्यांनी मास्क घातले नव्हते. त्यांना याबाबत जेव्हा मियामी येथील कार्यक्रमात विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, सतत मास्क घालणारे लोकही करोनाग्रस्त होतात. ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्याला कोणत्याही अधिकृत वैद्यकिय संस्थेने पुष्टि दिलेली नाही.
दरम्यान, अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केल्याचे दिसून येते. याआधीही त्यांनी करोनाबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.