भोपाळ – एका आईपासून तिच्या बाळाला वेगळं करणं कोणालाही शक्य नाही. मग समोर यमराजही उभा असला तरीही काही फरक पडत नाही. आपल्या बाळाला संकटापासून वाचवण्यासाठी एखादी आई काहीही करू शकते. आई ही आपल्या बाळावर निस्वार्थ प्रेम करत असते. अशाच एका आईच्या प्रेमाचा व्हिडियो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडियोमध्ये दिसतं, की बिबट्या लहान मुलाला पकडून घेऊन जातो. हे जेव्हा त्याच्या आईला कळते त्यावेळी ती माता स्वतःची पर्वा न करता बिबट्यासोबत भिडते.
हि घटना मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यातल्या कुसुमी ब्लॉकमध्ये असलेल्या टायगर बफर झोनमध्ये येणाऱ्या टमसार रेंजमध्ये बाडीझरिया गावत घडली आहे. गावाच्या आसपास घनदाट जंगल आहे. तेथे बिबट्या सोबत अनेक जंगली प्राणी असतात. यातच २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ७ वाजता गावातील किरण बैगा नावाच्या महिलेनं शेकोटी पेटवली होती. शेजारीच तिचा लहान मुलगा राहुल होता. त्यावेळी तिथे एक बिबट्या आला आणि राहुलला जंगलात घेऊन गेला.
राहुलला बिबट्या घेऊन जात असताना किरणनं पाहिलं. तिनं बिबट्याच्या मागे धाव घेतली. काहीवेळ बिबट्याचा पाठलाग केल्यानंतर बिबट्यानं पंजांनी राहुलला घट्ट धरल्याचं पाहताच किरणनं रौद्ररुप धारण केलं. हातातील काठी घेत ती पुढे सरसावली आणि बिबट्यावर तुटून पडली. तिनं कशीबशी बिबट्याच्या तावडीतून राहुलची सुटका केली.
मात्र या दरम्यान दोघा मायलेकांना गंभीर दुखापत झाली. तिने यावेळी जोरात आरडाओरड केल्या मुळे ग्रामस्थ घटने स्थळी पोहोचले. तिला आणि तिच्या बाळाला ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.