Masap Election 2026 – मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रसिद्ध लेखक-रंगकर्मी योगेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली साहित्य संवर्धन आघाडी मैदानात उरतली आहे. समविचारी साहित्यप्रेमींनी एकत्र येत या आघाडीची स्थापना केली असून ही आघाडी आगामी निवडणूक लढवणार आहे. परिषदेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही आघाडी स्थापन केल्याची माहिती सोमण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या आघाडीच्या वतीने योगेश सोमण अध्यक्षपदासाठी उमेदवार असून, प्रदीप निफाडकर कोषाध्यक्षपदासाठी, डॉ. स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाहपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. स्थानिक कार्यवाह पदासाठी सुनील महाजन, शाहीर हेमंत मावळे, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, कुणाल ओंबासे, नितीन संगमनेरकर आणि डॉ. गणेश राऊत हे सात उमेदवार रिंगणात आहेत. संदीप तापकीर यांना पुणे जिल्हा प्रतिनिधी पदासाठी पाठिंबा देण्यात आला आहे. दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत असून, परिषदेच्या कार्यपद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा जाहीरनामा आगामी दोन दिवसांत प्रसिद्ध करू. प्रत्येक मतदारापर्यंत मतपत्रिका पोहोचाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. अधिकाधिक मतदान व्हावे, ही आमची भूमिका आहे. सातारा साहित्य संमेलनाच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांचा हिशेब सर्वांसमोर आणून आवश्यक ती चौकशी केली जाईल, असे सोमण यांनी सांगितले. निवडून आल्यावर आम्ही कोणती कामे करणार आहोत, याची माहिती मतदारांना वचननाम्याच्या माध्यमातून दिली जाईल. संस्थेचे कामकाज पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने चालावे, यासाठी आमचा लढा आहे. ही लढाई धमकी विरुद्ध विनंती, लालूच विरुद्ध प्रतिष्ठा अशी आहे. सदोष मतदार यादी पारदर्शक करण्याचा आमचा मानस आहे. सध्याची निवडणूक प्रक्रिया घटनेनुसार होत नसल्याचा आमचा आरोप आहे, असेही निफाडकर यांनी नमूद केले.