मेरी कोम

वर्ल्ड बॉक्‍सिंग चॅम्पियन, ऑलिम्पिक चॅम्पियन, खासदार, बॉक्‍सिंग अकॅडमीच्या मालक, सरकारी पर्यवेक्षक, आई, पत्नी अशा विविध भूमिका एकाच वेळी निभावत असलेल्या मेरी कोम यांची कारकीर्द खूप प्रेरणादायी अशी आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुण मुलींनी बॉक्‍सिंगमध्ये करियर करायचे असे ठरवले आहे. केवळ महिलांसाठीच नव्हे पुरुषांसाठी देखील त्या प्रेरणास्रोत आहेत. मेरी कोम या देशाचा अभिमान आहेत. पुढील वर्षी जपानमधील टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्या भारतासाठी पदक जिंकणार असा विश्‍वास देशातील 130 कोटी जनतेला आहे. मेरी कोम यांना शुभेच्छा!

नुकत्याच झालेल्या प्रेसिडेंट कप स्पर्धेत भारताची बॉक्‍सर मेरी कोम हिने सुवर्णपदक मिळवले अशी बातमी नुकतीच वर्तमानपत्रात वाचली खरंतर आता या बातमीची सवय झाली आहे. मेरी कोमने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवायचा धडाकाच लावला आहे. ज्या स्पर्धेत मेरी कोम सहभागी होतात, त्या स्पर्धेत भारताचे सुवर्णपदक निश्‍चित असते. मेरी कोम आणि पदक हे जणू समीकरणच बनले आहे. मेरी कोमचे सध्याचे वय 37 वर्ष आहे. या वयात महिलाच नाही तर अनेक पुरुष खेळाडू खेळातून निवृत्ती स्वीकारुन आपल्या कुटुंबात रममाण होतात, पण मेरी कोम मात्र या वयातही बॉक्‍सिंग रिंग गाजवीत आहेत. दोन मुलांची आई असलेली मेरी कोम आजही कमालीची फिट आहे. दुखापतीमुळे मेरी कोमने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतली असे कधीच झाले नाही. जेंव्हा त्यांनी त्यांच्या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला तेंव्हा सर्वांना वाटले की, मेरी कोम आता बॉक्‍सिंगचे ग्लोव्हज घालणार नाही पण आपल्या दोन्ही मुलांना सांभाळीत त्यांचे योग्य पालन पोषण करीत असताना त्यांनी आपल्या सरावात कधीही खंड पडू दिला नाही. दोन मुलांची आई असलेल्या मेरी कोम ज्याप्रमाणे मैदान गाजवीत आहेत, ते पाहता त्यांच्यासाठी सुपर मॉम हाच शब्द परफेक्‍ट लागू होतो.

त्यांची कहाणीच विलक्षण आहे. मणिपूरमधील कांगथेयी या दुर्गम गावात 1 मार्च 1983 रोजी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आपल्या मुलीने बॉक्‍सिंगमध्ये करियर करावे असे तिच्या आईवडिलांना वाटत नव्हते. जेंव्हा ते शेतात जात, तेंव्हा लहान भावंडांना सांभाळीत मेरी बॉक्‍सिंगचा सराव करीत असे. 1998 साली डिंको सिंग यांनी अशिआई स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. डिंको सिंग यांना सुवर्णपदक जिंकताना मेरीने टीव्हीवर पाहिले आणि आपणही देशासाठी असेच सुवर्णपदक मिळवावे असा निश्‍चय केला. या निश्‍चयाने त्यांना झपाटून टाकले. मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही.

अखेर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. 2000 साली त्या स्टेट चॅम्पियन झाल्या. 2001 पासून सलग तीन वेळा त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. यादरम्यान त्यांचा विवाह झाला. दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्यावर त्यांनी दोनदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. इतकेच नाही तर ऑलिम्पिक पदक देखील त्यांनी आई बनल्यानंतरच जिंकले. पाच वेळा विश्‍व चॅम्पियन आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला खेळाडू आहेत. 2011 मध्ये मेरी कोम यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलाची हृदय शस्त्रक्रिया होणार होती, त्याचवेळी चीन मधील आशिया स्पर्धेसाठी त्यांना जायचे होते. काय निर्णय घ्यायचा, हे आव्हान त्यांच्यापुढे होते. शेवटी त्यांचे पती मुलाजवळ थांबले आणि त्या चीनला गेल्या. नुसतं गेल्या नाही तर देशासाठी सुवर्णपदकही जिंकल्या. ही त्यांच्यासाठी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.

2012 साली लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी ब्रॉन्झ पदक मिळवले होते. आशिया, राष्ट्रकुल, विश्‍व चॅम्पियनशिप, ऑलिम्पिक अशा सर्व महत्वाच्या स्पर्धेत पदके मिळवणाऱ्या मेरी कोम यांचा सरकारने अर्जुन व पदमश्री पुरस्कार देऊन योग्य असा गौरव केला आहे. इतकेच नाही तर राष्ट्रपतींच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेची खासदारकीही देण्यात आली आहे. खासदार झाल्यापासून मेरी कोम यांचे जीवन आणखी धकाधकीचे बनले आहे. दिल्लीतील राष्ट्रीय कॅम्पमधून सराव करुन झाल्यावर त्या सरळ संसदेत जातात आणि राज्यसभेचे खासदार म्हणून सहभागीही होतात. संसदेत त्यांच्या नावापुढे अनुपस्थित हा शेरा खूप कमी वेळा पाहायला मिळतो. 2013 साली त्यांनी अन ब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले. 2014साली त्यांच्या जीवनावर आधारित मेरी कोम याच नावाचा एक हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)