नवी दिल्ली – भारताची अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू, खासदार सुपरमॉम मेरीकोम हिनेही करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. तिने आपला पगार या कामी दिला असून केवळ इतकेच नाही तर आपल्या खासदार निधितून 1 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार असल्याचे सांगितले.
चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंचा धोका भारतालाही बसत आहे. त्यात अनेकांचे जीव धोक्यात आले असून विलगीकरण कक्षही कमी पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केल्याने करोनावर नियंत्रण मिळविणे कठीण नाही, असा विश्वासही मेरीनो व्यक्त केला.
माझ्या बॅंक खात्यातून 1 लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्यात यावे, असे पत्र मेरीने बॅंकेकडे दिले असून येत्या दोन दिवसांत हा निधी जमा केला जाणार आहे.
मेरी राज्यसभेवरील खासदार आहे, तसेच एक अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू असल्याने करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ती काय करणार आहे, असे प्रश्न गेल्या पाच दिवसांपासून सोशल मीडियावर विचारले जात होते. हाच प्रश्न निकालात काढताना मेरीने ही मदत जाहीर केली.
टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली मेरी सध्या लॉकडाऊनमुळे घरातच होती. मेरीने क्रीडारसिकांनाही मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले असून हे आवाहन करण्यापूर्वी तिनेच पहिला निधी जाहीर केला. देशातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी मदत देणे सुरु केले आहे.