नवी दिल्ली – कच्च्या मालाचे दर एकतर्फी वाढत असल्यामुळे मारुती-सुझुकी सप्टेंबर महिन्यापासून आपल्या विविध उत्पादनाच्या दरात वाढ करणार आहे. कंपनीने शेअर बाजारांना कळलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यापासून कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे आम्हाला दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र कंपनीने कोणत्या उत्पादनाचे दर किती वाढणार आहेत याबाबत स्पष्टीकरण केलेले नाही.
पुढील आठवड्यात याबाबत माहिती जारी केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मारुती ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे इतर कार कंपन्यांही आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.