मागणी नसल्यामुळे सलग चार महिन्यांपासून उत्पादनात कपात
नवी दिल्ली – मारुती सुझुकी कंपनीने मे महिन्यात उत्पादनात 18 टक्के कपात केली. ही माहिती कंपनीने शेअर बाजारांना दिली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून मागणी कमी झाल्यामुळे मारुती कंपनीने उत्पादनात कपात केली आहे.
मे महिन्यात या कंपनीने 1,51,188 वाहनांची निर्मिती केली. गेल्या वर्षी मे महिन्यात या कंपनीने एक 1,84, 612 इतक्या वाहनांची निर्मिती केली होती. कंपनीने आपल्या सर्वच वर्गातील वाहनांच्या उत्पादनात कपात केले असल्याचे शेअरबाजाराला दिलेल्या माहितीतून आढळून येते.
एप्रिल महिन्यातही कंपनीने आपल्या वाहनाच्या उत्पादनात 10 टक्के कपात केली होती. मार्च महिन्यात वाहन उत्पादनात 21 टक्के कपात केली होती. फेब्रुवारी महिन्यात कंपनीने वाहन उत्पादनात 8 टक्के कपात केली होती.
भांडवल असुलभता आणि इतर कारणांमुळे काही महिन्यापासून ग्राहकांकडून वाहनांची खरेदी कमी झाली आहे. एप्रिल महिन्यात वाहन खरेदीत 17 टक्के घट झाली. हा 8 वर्षांचा नीचांक आहे. महिंद्रा कंपनीने आपल्या उत्पादनात कपातीसाठी या तिमाहीत 13 दिवस काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.