शहीद निनाद मांडवगणे अनंतात विलीन

चिमुकलीला पाहून गोदाकाठ हेलावला

नाशिक: जम्मू-काश्‍मीर येथील बडगाममध्ये घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले नाशिकमधील वैमानिक निनाद मांडवगणे यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.नाशिकमधील गोदाकाठावर या भारतमातेच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने हजर होते.

निनाद मांडवगणे यांचे पार्थिव आज सकाळी डीजीपीनगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव बाहेर आणले. यावेळी दोन वर्षांच्या चिमुकलीने आपल्या बाबांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून तिथे उपस्थितांचे मन हेलावले. निनाद यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. यानंतर डीजीपीनगरहून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.

हवाई दलाने दुपारी साडेबाराच्या सुमारास निनाद मांडवगणे यांना मानवंदना दिली. मग लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते.

नाशिकचे पायलट स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचा बडगाममध्ये 27 फेब्रुवारीला हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई-वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. निनाद हे औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26 व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. तिथून त्यांची निवड पुण्यातील एनडीएमध्ये झाली. त्यानंतर ते हेलिकॉप्टर पायलट बनले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×