पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत आजमितीस 1,500 हून अधिक महिला आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदीसह बंगाली, तामिळी साक्षर महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेतील पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दर 15 दिवसांनी पुस्तकांची पेटी वस्तीतून फिरवण्यात येणार आहे.
या महिलांचा मानसिक विकास व्हावा, विचार परिवर्तन व्हावे, असा यामागील उद्देश आहे, अशी माहिती सहेली संघच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मैत्र युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत देशपांडे, सहेली संघाच्या मंदाकिनी भदाने, महादेवी मदार आदी उपस्थित होते.
उपक्रमाचे उद्घाटन दि.1 मार्च रोजी होणार आहे. या उपक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी ही पुस्तके देणार आहेत. जोशी यांनी नुकतेच वयाच्या 85 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ते 85 पुस्तके देणार आहेत. ही पुस्तक पेटी सहेली संस्थेमध्ये ठेवण्यात येणार आहे. दर 15 दिवसांनी सहेली संस्थेतील स्वयंसेवकांसोबत मैत्र फाउंडेशनमधील तरुणाई ही पेटी घेऊन वस्तीमध्ये फिरणार आहे.