पाचगणी – कासवंड, ता. महाबळेश्वर येथील सौ. सोनल विपुल जाधव (वय 26) या विवाहितेने रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
तिला चौदा महिन्यांची मुलगी असून ही चिमुकली पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सौ. सोनलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कासवंड येथील सौ. सोनल जाधव हिने आज सकाळी दहाच्या सुमारास आत्महत्या केल्याची फिर्याद तिचे वडील हनुमंत यशवंत पवार (मूळ रा. मांघर, सध्या रा. कासवंड, ता. महाबळेश्वर) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात दिली.
तिच्या पश्चात पती, 14 महिन्यांची मुलगी व सासू असा परिवार आहे. सासू व पती हे दोघे नेहमीप्रमाणे आज सकाळी कामावर गेले होते. त्यानंतर विपुलने काही कामानिमित्त घरी फोन केला असता, सोनलने फोन घेतला नाही. त्यामुळे विपुलने घरी जाऊन पाहिले असता, सोनलने आत्महत्या केल्याचे दिसले.
त्याने आरडाओरडा केल्याने शेजारचे लोक गोळा झाले. सोनलचे वडील हनुमंत पवार हे गावातच राहत असल्याने ते धावत आले. त्यांनी फिर्याद दिल्यानंतर सपोनि सतीश पवार व कर्मचारी व्ही. आर. मुळे घटनास्थळी दाखल झाले.