पोलिसी खाक्याने वाचविले दोन संसार
पिंपरी – दोन विवाहित पुरुष पळून जाऊन प्रेमविवाह करण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन संसार उध्वस्त होण्यापासून वाचले. हा प्रकार सोमवारी (दि. 8) पिंपरी चिंचवड येथील सांगवी येथे उघडकीस आला. या दोन्ही विवाहित पुरुषांना मुले देखील आहेत.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी सांगवी पोलीस ठाण्याचा फोन खणाणला. माझा भाऊ एका पुरुषासोबत पळून जाऊन विवाह करणार आहे. आम्हाला मदत करा, असे एका महिलेने फोनद्वारे सांगवी पोलिसांना कळवले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ सूत्रे हालवली. काही तासातच दोन्ही पुरुषांना पोलीस ठाण्यात आणले. सुरुवातीला दोघेही काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांनी गोड बोलून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोघेही पोलिसांनाच कायद्याची भाषा सांगू लागले. त्यांच्या वागण्यामुळे दोन संसार आणि मुलेही यांच्यावरही वाईट परिणाम होणार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी शेवटी पोलीसी खाक्या दाखवत त्यांना त्यांची चूक दाखवून दिली. तसेच, दोघांनीही मुलांच्या आणि पत्नीच्या भविष्याची तरतूद करावी, मगच निर्णय घ्यावा, असे समजावले. पोलिसांनी केलेल्या समुपदेशनानंतर दोघांनीही आपली चूक कबूल केली. तसेच, भविष्यात एकमेकांना न भेटण्याची खात्री देत स्वतःची सुटका करून घेतली.
यापूर्वीही ते भेटत असल्याने कुटुंबियांना संशय आला होता. त्यांना त्या दोघांवरही लक्ष ठेवले. दरम्यान दोघे पळून जाणार असल्याचे कळताच कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेत त्यांचे मनसुबे उधळून लावले.