चाकण येथील घटना : प्रेयसीच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर नवरदेव झाला तयार
महाळुंगे इंगळे – तुम्हाला शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा “विवाह’ चित्रपट आठवतो का? या चित्रपटात ज्या पद्धतीने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात “विवाह’ केला गेला, अगदी त्याचप्रमाणे चाकण (ता. खेड) येथेही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लग्न लागले. यात फरक एवढाच आहे की, चित्रपटात “प्रेमा’मुळे तर चाकण येथे प्रेमात फसल्याने तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित तरुणाला तरुणीशी हॉस्पीटलमध्ये “ऑन दी स्पॉट’ लग्न करावे लागले.
चित्रपटात आणि या घटनेचाही शेवट गोड झाला. प्रेमाला जात नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, तसे लग्न करण्यासाठीही मांडवाची गरज नसते, हे यावरून स्पष्ट झाले. चाकण उद्योग पंढरीत कामानिमित्त आलेल्या एका तरुण-तरुणीची चाकण भागात ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले; परंतु, तरुणी मागासवर्गीय आहे, हे तरुणाला कळल्यावर त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याने चक्क लग्नास नकार दिला. तु मागासवर्गीय असल्यामुळे मी तुझ्या बरोबर लग्न करणार नाही, असे म्हणून तिला भेटण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे समाजात आपली बदनामी होईल, या भीतीने तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा धक्कादायक प्रकार येथील गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या कानावर गेला.
त्यांनी ताबडतोब ती तरुणी ज्या दवाखान्यात उपचार घेत आहे. त्याठिकाणी जावून तिचे म्हणणे ऐकून घेतले. तरुणीची फसवणूक होवू नये, यासाठी वाघमारे यांनी पुढाकार घेत तरुणाच्या घरच्या लोकांवर कायद्याचा दबाव आणत त्यांची समजूत काढली. त्यामुळे तरुण लग्नास तयार झाल्याने येथील हॉस्पिटलमध्ये “ऑन दी स्पॉट’ त्या दोघांचे लग्न लावून देण्यात आले. यावेळी संघटनेचे काही सदस्य व तरुण-तरुणीचे मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.
समोरील तरुणी कुठल्याही जातीची असो, मात्र, तिच्यावर अन्याय होता कामा नये. उडाणटप्पू तरुणांना या विवाहाने मोठी चपराक बसणार आहे. जे भामटे तरुणींच्या भावनांशी खेळतात. त्यांना वठणीवर आणण्याचे काम भविष्यकाळात करणार आहे. मुलगी म्हणजे खेळणे नव्हे, मुलींच्या भावनाशी खेळलात, तर तुम्हांला धडा शिकवला जाईल.
– संजय वाघमारे,अध्यक्ष, गनिमी कावा संघटना