विवाह आणि गुणमिलन

अलीकडील काळात विवाह जमणे ही एक समस्याच झाली आहे. योग्य वयात लग्न जमून सुयोग्य जोडीदार मिळाला म्हणजे आईवडील सुटकेचा निःश्‍वास टाकतात, त्यांचा जीव भांड्यात पडतो!

महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या लग्नात धर्म, जात, रूप, नोकरी-व्यवसाय, उत्पन्न, स्वतःचे घर, दोघांच्या वयातील अंतर, नातेसंबंध, एकत्र-विभक्त कुटुंब पद्धती, मुलावरील जबाबदाऱ्या, विवाहातील देणी-घेणी इत्यादी विषयांचा समावेश होतो, व ते स्वाभाविकही आहे. वर्षो न्‌ वर्षे चालत आलेल्या रूढी, परंपरा, पद्धतीना सोडण्यास कोणी सहसा तयार होत नाही. परंतु, विवाहाचा विषय निघताच पहिला प्रश्‍न विचारला जातो, “गुण किती?’

वधू-वरांच्या पत्रिकेचे गुणमिलन या विषयाला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दोघांच्या पत्रिका एकमेकांना संतती, स्वभाव, नातेसंबंध, आरोग्य इ. आठ गोष्टी संबंधात पूरक आहेत का हे पाहण्याचे ते कोष्टक आहे. त्यात 18 गुणला पासिंग व 36 गुण म्हणजे पैकीच्या पैकी गुण. दोन्ही बाजूकडील मंडळी त्यांच्या गुरुजींमार्फत हे गुण काढून घेतात. शिवाय गुरुजी पत्रिकेतील, सामान्यांना न लक्षात आलेले, कालसर्पयोग, दूषित मंगळ, अनिष्ट ग्रह, अशुभ योग इ. विषयक माहितीही देत असतात. त्यावर उपायही सुचवितात. परंतु, एवढ्या चाचण्या लावल्यामुळे आलेल्या पत्रिकेपैकी पन्नास टक्के पत्रिका बाद ठरतात, उरलेल्या पत्रिकांना वर नमूद केलेल्या कसोट्या लावल्या जातात. त्यातून तावूनसुलाखून निघालेल्या पत्रिकाच फक्त विवाह जमविण्यास विचारार्थ उरतात! दिवसेंदिवस लोकसंख्येमधील स्त्रियांचे, भ्रूणहत्या इत्यादीमुळे होणारे कमी प्रमाणही मागणी-पुरवठा या तत्त्वात बसत नाही व विवाह प्रश्‍न जटिल बनतो.

पत्रिकेमुळे/गुणमिलनामुळे पन्नास टक्के पत्रिका जर बाद ठरत असतील तर याबाबतीत सामान्य माणसाच्या काही स्वाभाविक शंका येऊ शकतात त्या अशा –
1) ज्या पत्रिका पाहून गुणमिलन केले जाते त्या पत्रिका तारीख, वेळ, इ. बाबत अचूक आहेत याची खात्री काय?
2) पत्रिका/गुणमिलन पाहणाऱ्या गुरुजींचा या विषयातील अभ्यास किती? याला मोजण्याचं मापदंड उपलब्ध नाहीत.
बऱ्याचवेळा एकाच पत्रिकेबाबत दोन गुरुजींची दोन वेगवेगळी मतं पडतात. मग अशा परिस्थितीत द्विधा अवस्था होते, चांगले स्थळ हातचे जाते.
3) कधी कधी गुरुजी व्यवसायास प्राधान्य देणारे असतील तर कुंडलीतील अनिष्ट ग्रह, कालसर्पयोग, दोषमुक्त मंगळ यांच्या शांती केल्या असता तो दोष नाहीसा होईल व विवाह योग लवकर जुळून येईल असे सांगतात. त्यासाठी अर्थातच बराच खर्च अपेक्षित असतो.
अशा प्रकारे कुंडलीतील दोष नाहीसे करण्याचे सामर्थ्य जर अशा धार्मिक क्रियात असेल, तर प्रत्येकजण काही खर्च करून आपली कुंडली स्वच्छ/ दोषमुक्त करून घेईल. हे अविश्‍वसनीय आहे.

मुला-मुलींना विवाह ठरण्याअगोदर एकमेकांचे विचार देवाण-घेवाण करण्याची संधी द्यावी. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराकडून नेमक्‍या अपेक्षा काय आहेत हे कळण्यास मदत होईल. कोणत्या गोष्टीत ते तडजोड करावयास तयार आहेत हे समजून येण्यास मदत होईल. उदाहरणार्थ 1) एकत्र कुटुंबात राहण्याची तयारी, 2) घरातील ज्येष्ठांची/आजारी व्यक्तीची देखभाल 3) एकमेकांच्या आवडीनिवडी, छंद, श्रद्धेची स्थान/देवता इत्यादीविषयी माहिती. 4) आरोग्यविषयक काही प्रश्‍न असतील तर त्याचीही माहिती एकमेकांना असावी. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वभाव! तो आपल्या स्वभावाशी जुळणारा असावा. दोघामध्ये विश्‍वासाचं वातावरण असावं!

सारांश रूपाने विवाह योग्य वयात व सुयोग्य जोडीदाराबरोबर व्हावा यासाठी खालील गोष्टींचं गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. खरं महत्त्व प्रत्यक्ष समोर काय दिसतं याला असावं. मुला-मुलीचं आरोग्य, निर्व्यसनी असणं, चांगल्या सवयी, उच्च शिक्षण, आर्थिक नियोजन, शांत संयमी प्रेमळ स्वभाव. ध्येय, समाजाप्रती काही करण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तडजोडीची वृत्ती असावी. नाही तर पत्रिकेत 36 गुण अन्‌ दोघांची तोंडं एकाच दक्षिणेकडे तर दुसऱ्याचं उत्तरेकडे व्हायचं!

विवाह व विवाह व्यवस्था टिकण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोणावरही टीका-टिप्पणी करण्याचा हेतू नाही. परंतु, शास्त्रालाही मर्यादा असतात. हे जाणून वर्तमानाला भविष्यापेक्षा अधिक महत्त्व देणं श्रेयस्कर!

– हेमलता आडकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.