मार्नस लॅब्युशान लंबी रेस का घोडा

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राखीव खेळाडूबाबत एक नवा नियम लागू झाला. या नियमानुसार एखाद्या संघाचा खेळाडू डोक्याला चेंडू लागून किंवा डोक्याला दुखापत होऊन मैदानाबाहेर गेला तर हा संघ त्या खेळाडूऐवजी राखीव खेळाडू मैदानात उतरवू शकतो. जखमी झालेला खेळाडू फलंदाज अथवा गोलंदाज असेल त्याप्रमाणे हा राखीव खेळाडू फलंदाजी अथवा गोलंदाजी करू शकतो.

नियम लागू झाल्यावर पंधराच दिवसात अॅशेस मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागून ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ जखमी झाला. त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी मार्नस लॅब्युशान हा खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या संघात आला. स्टीव्ह स्मिथसारख्या खेळाडूच्या जागी आपल्याला संधी देऊन संघ व्यवस्थापनाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे आव्हान लॅब्युशानसमोर होते.

खरंतर अॅशेस मालिकेआधी मार्नस इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळला होता. तिथे 18 डावात केलेल्या 1114 धावांमुळे त्याला अॅशेससाठी संघात संधी मिळाली. मात्र अशा काही विचित्र रीतीने आपल्याला खेळण्याची संधी मिळेल असे त्याला स्वप्नातही वाटले नसेल. त्याने दुसऱ्या डावात 59 धावा करत सुरुवात दमदार केली. नव्या नियमानुसार खेळणारा आणि कसोटीत अर्धशतक करणारा पहिला राखीव खेळाडू असा विक्रम त्याने आपल्या नावे केले. अॅशेसच्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतक आणि मालिकेत एकूण चार अर्धशतके काढत त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले.

इथून तो जो सुटला तो सुटलाच! नोव्हेंबर 2019 मध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने आपले पहिले कसोटी शतक 185 काढले. त्यापाठोपाठ दुसऱ्या सामन्यातही शतक काढले. डिसेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत शतक काढत त्याने सलग तीन शतके झळकावली. याच कसोटीच्या दुसऱ्या डावात आणि तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने अर्धशतक काढले. याबरोबरच 2019 मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा काढण्याचा मानही मिळवला.

नव्या वर्षाची सुरुवात होते न होते तोच त्याने आपले पाहिले द्विशतक झळकावत आपली धावांची भूक 2019 पुरती मर्यादित नसल्याचे संकेत दिले आहेत. या महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठीदेखील त्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड झाली आहे. डिसेंबरपर्यंत दर्दी क्रिकेटरसिक आणि समीक्षक सोडले तर मार्नसकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. त्याच्या अवघड आडनावामुळे भारतासारख्या क्रिकेट धर्म असलेल्या देशातही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे झाले.

अनेकदा त्याची कामगिरी लक्षात येऊनही आपल्याकडे मात्र ‘ऑस्ट्रेलियाचा कुणीतरी नवा खेळाडू भारी खेळतोय.’ एव्हढ्यापर्यंतच त्याचं कौतुक मर्यादित राहीलं. आपल्या दमदार कामगिरीने मार्नसने मात्र साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. स्मिथ, वॉर्नरच्या पुनरागमनावर सगळ्या मीडियाच्या नजरा असताना मार्नसने आपल्या कामगिरीने आपण लंबी रेस का घोडा असल्याचे दाखवून दिले आहे.

अनेक गुणवान खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये योग्य संधी मिळाली नाही म्हणून, तर काहीजण मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही म्हणून लवकर विस्मरणात जातात. असे असताना लॅब्युशानने मात्र काहीशा अपघातानेच मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवलाय. नव्या वर्षाची सुरुवात द्विशतकाने करणाच्या लॅब्युशानच्या उरलेल्या वर्षातील कामगिरीबाबत उत्सुकता असेल हे मात्र नक्की.

– आदित्य गुंड

Leave A Reply

Your email address will not be published.