पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथत ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या नियमित व बॅकलॉग परीक्षा मॉक्टर्ड पद्धतीने ऑनलाइनद्वारे होणार आहे. परीक्षेनंतर 48 तासांत विद्यार्थ्यांना विषयात मिळालेले गुण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गुरुवारी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेसंदर्भात परीक्षा विभागाने मार्गदर्शक तत्त्वे व सूचना जाहीर केल्या. विद्यार्थ्यांच्या नियमित, बॅकलॉग व रिपीटर परीक्षांचे नियोजन दि. 10 एप्रिलपासून केले आहे. या परीक्षा फक्त ऑनलाइन प्रॉक्टर्ड बहुपर्यायी प्रश्नाद्वारे (एमसीक्यू) एक तासाची परीक्षा अशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. 50 गुणांच्या परीक्षेसाठी 60 मिनिटाचा कालावधी असेल. यासाठी 60 बहुपर्यायी प्रश्न दिले जातील. त्यातून 50 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरली जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.
सराव परीक्षा 5 ते 9 एप्रिलदरम्यान
ऑनलाइन परीक्षेची संपूर्ण माहिती होण्यासाठी परीक्षेमधील नमुना प्रश्नांवर आधारित सराव परीक्षा (मॉक टेस्ट) मुख्य परीक्षेपूर्वी 5 ते 9 एप्रिलदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत या कालावधीत घेण्यात येणार आहे. सराव परीक्षेमुळे विद्याथ्यांना ऑनलाइन परीक्षा योग्य पद्धतीने देणे सोयीचे होणार आहे.
तांत्रिक अडचणीसाठी टोल क्रमांक
ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्यांला संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. यापूर्वी सोडविलेली उत्तरे ही “सेव्ह’ होऊन खंड पडल्यास तेथून परीक्षा पुन्हा सुरू होईल. परीक्षेदरम्यान काही अडचणी आल्यास 020- 71530202 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा विभागाने केले आहे.
गुणासंदर्भात तक्रार 48 तासांच्या आत करा
विद्यार्थ्यांना विषयात मिळालेले गुण हे परीक्षेनंतर 48 तासांत “स्टुडंट प्रोफाइल सिस्टिम’मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील 48 तासांच्या आत अडचणी व शंका असल्यास तक्रार तेथेच नोंदवावी लागेल. “स्टुडंट प्रोफाइल सिस्टिम’मध्ये नोंदविलेल्या तक्रारीच ग्राह्य धरण्यात येतील व त्यानंतर कोणत्याही सबबीवर तक्रार स्वीकारली जाणार नसल्याचे मार्गदर्शक सूचनात नमूद केले आहे.