अबाऊट टर्न: बाजार

हिमांशू

लोकसभा निवडणुकांचे निकाल उद्या हाती येत असताना रविवारपासून तीन बाजार गरम आहेत. एक शेअरबाजार, दुसरा सट्टाबाजार आणि तिसरा अफवांचा बाजार! शेअरबाजाराची महती काय सांगावी महाराजा…! जरा खुट्ट वाजले तरी इकडचे तिकडे होते. मध्यंतरी एकदा केंद्रात कडबोळे सरकार येणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या सरकारचे नेतृत्व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते ज्योती बसू यांनी करावे, अशी मागणी पुढे आली… खल्लास! लगेच शेअरबाजार धडाधडा कोसळला.

नुसत्या मागणीमुळे! मग खरोखर ज्योती बसू पंतप्रधान झाले असते तर…? अर्थात, ज्योती बसूंनी ही ऑफर नाकारली आणि ती “ऐतिहासिक चूक’ होती असे आजतागायत सांगत फिरायला डाव्या नेत्यांना निमित्त मिळाले, हा भाग वेगळा! जणूकाही बसू पंतप्रधान झाल्यावर डाव्यांची ताकद झटक्‍यात वाढणार होती! राजकीय पक्ष म्हणजे शेअरबाजार नव्हे, तो झटक्‍यात चढत किंवा कोसळत नाही, हे सातत्याने स्वप्नात राहणाऱ्यांना कुणी सांगावं? शिवाय, शेअरबाजार कोसळला तर तो बातमीचा विषय ठरतो… राजकीय पक्षाची गाडी एकदा उताराला लागली की ड्रायव्हर बदलून फारसा उपयोग होत नसतो. असो, मुद्दा असा की, अमक्‍या-तमक्‍याचं सरकार येणार, अशी चर्चा सुरू झाली तरी शेअरबाजाराचा जीव खालीवर होतो. आजच्या काळातसुद्धा किती “संवेदनशीलता’ जपलीय ना बाजारानं!

दुसरा बाजार आम्हाला खूपच अपरिचित आहे. निवडणुकांच्या निकालांवर सट्टा खेळणे कायदेशीर आहे का, असाही प्रश्‍न आमच्यासारख्या कधीही “आकडा’ न खेळलेल्या पामरांना पडतात. बहुधा हाही सट्टा कायदेशीर नसावा… पण मग कोणत्या पक्षाचा दर किती? कोणत्या पक्षावर किती पैसे लागलेत? सट्टाबाजार कोणत्या पक्षाला किती जागा “बहाल’ करतोय? अशा प्रश्‍नांची साद्यंत उत्तरं देणाऱ्या बातम्या कशा प्रसिद्ध होतात, याचंच नवल वाटते.

आता तर राजस्थानातल्या सट्टेबाजारांनी काय अंदाज काढलाय आणि गुजरातेतल्या सट्टेबाजारांची आकडेवारी किती, एवढे डिटेल्स प्रसिद्ध होऊ लागलेत. सट्टाबाजाराचा अंदाज हा पैशांच्या देवघेवीशी संबंधित असल्यामुळे कोणत्याही एक्‍झिट पोलपेक्षा ही आकडेवारी अधिक विश्‍वसनीय मानणारे महाभाग आहेत! खरे तर खास परवानगी घेऊन चॅनेलवाल्यांनी हाच अंदाज “एक्‍झिट पोल’ म्हणून दाखवला तर…? किमान सात-आठ वेगवेगळे अंदाज आणि त्यांच्या आकडेवारीतला प्रचंड फरक पाहून आमच्यासारख्यांना येणारी किंकर्तव्यमूढावस्था तरी टळेल! पण उच्चभ्रूंच्या सट्टेबाजीबद्दल अस्सल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिलेली माहिती ऐकून आम्ही सर्द झालो. त्यांच्या मते, “एक्‍झिट पोल’द्वारे वातावरणनिर्मिती करून सामान्यांना सट्टा लावायला भाग पाडले जाते. त्यांच्या खिशातला पैसा आपल्या खिशात ओढण्याची ही क्‍लृप्ती आहे म्हणे… आता बोला!

तिसऱ्या म्हणजे अफवांच्या बाजाराबद्दल बोलण्यासारखे काही शिल्लक राहिलेले नाही. निवडणुकीच्या कालावधीत अफवा हाच अनेकांचा राजमार्ग बनल्यामुळे आता कानावर आलेली बातमी खरी की खोटी, हे पुरतं कळेनासं झालंय. त्यातच ईव्हीएम बदलली जाताहेत अशी बातमी परदेशी माध्यमातून दिली गेल्यामुळे काल वातावरण आणखी तापले. ईव्हीएमबद्दल आधीच वातावरणात गोंधळ; मनात गोंधळ. त्यात ही बातमी खरी की खोटी, हा गोंधळ! निदान निकालाची बातमी खरी असावी, एवढीच तूर्त अपेक्षा!

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×