फक्त शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच प्रवेश
कामाशिवाय येणाऱ्या खासगी व्यक्तींना थेट प्रवेशबंदी
पुणे – मार्केट यार्डातील बाजार आवारात शेतीमाल घेऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांनाच प्रवेश असणार आहे. या व्यतिरिक्त इतर वाहनांचा प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या आणि बाजार घटकांच्या व्यक्ती सोडून इतर व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. येत्या शुक्रवारपासून (दि. 27) या नियमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. त्यावेळी उपसचिव सतीश कोंडे, सहायक सचिव दीपक शिंदे, फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे, स्थापत्य विभागप्रमुख प्रमोद तुपे, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आदी उपस्थित होते.
फळे, भाजीपाला बाजार आवारातील कामकाज आणखी सुलभता यावी, सुरक्षा, स्वच्छता, वाहतुकीत सुरळीतता यावी, यासाठी नुकतीच सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले, “आडत्यांना गाळ्यापासून पंधरा फुटाच्या आत शेतीमाल विक्रीसाठी ठेवण्याबाबत 1 मार्च 2018 रोजी झालेल्या नियमाचे पालन करावे लागणार आहे.
त्यापुढे शेतीमाल लावल्यास 5 हजार रुपये दंड जीएटीसह आकारण्यात येणार आहे. मागील महिन्याचे जमा बाजार शुल्क आणि देखरेख खर्च पुढील महिन्यात 5 तारखेपर्यंत भरावे लागणार आहे. अन्यथा त्यावर 12 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. तरकारी विभागात दुपारी 12 पर्यंतच गाळ्याच्या पुढील भागात विक्री करता येणार आहे. त्यानंतर 2 पर्यंत गाळ्यावर विक्री करता येणार आहे. तर, फळ विभागात दुपारी 2 पर्यंत विक्री होणार आहे. याबाबतचे नियम मोडल्यासही जीएसटीसह 5 हजार रुपये दंड होणार आहे. गाळ्यावर आडते, त्यांचा 1 दिवाणजी, 1 मदतनीस असणार आहे.
त्यांच्याकडे सर्व हमाल, कामगार यांच्याकडे बाजार समितीचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्या ओळखपत्राशिवाय बाजार आवारात प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक विभागातील आडत्यांनी गाळ्यावरील कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनमध्ये टाकावा, असे नवीन नियमावलीत नमुद केल्याचे म्हटले आहे.’
कृषी माल बाजारात आल्यानंतर तो योग्य वेळी बाहेर जाणे आवश्यक आहे. सुकाणू समितीच्या बैठकीत सर्वानुमते ही नियमावली लागू करण्यास शिक्कामोर्तब झाले आहे. ही बाब स्वागतार्ह आहे.
– विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन.