पुणे : शहरातील लॉकडाऊनमधील निर्बंध रविवारपासून (19 जुलै) काही प्रमाणात शिथिल होणार आहेत. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, भाजीपाला, चिकन, मटण विक्रीची दुकाने उघडण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. रविवारपासून मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार सुरु होण्याची शक्यता होती. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी मार्केटयार्डाचे कामकाज सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय न देण्यात आल्याने रविवारी मुख्य भाजीपाला बाजार बंदच राहणार आहे.
मार्केटयार्डातील कामकाज सुरु करण्याबाबत अद्याप स्पष्ट अशा सूचना आल्या नाहीत. मार्केटयार्डात होणारी गर्दी, शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने रविवारपासून सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत खुली ठेवण्यास सांगितले होते. मात्र, ती आता जास्त वेळ उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
थोड्या कालावधीमध्ये मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार, कांदा बटाटा विभाग, फळ, फूल बाजार तसेच गूळ आणि भुसार बाजाराचे कामकाज करणे शक्य होणार नाही, असे मत बाजार घटकांनी व्यक्त केले आहे. या पाश्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मार्केटयार्डातील कामकाजाची वेळ वाढवून देण्याची विनंती जिल्हा प्रशासन आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने रविवारी मार्केटयार्ड बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख म्हणाले, प्रशासनाकडून निर्णय झाल्यानंतर मार्केटयार्ड सुरु करण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे रविवारी मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रशासनाने मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर बाजार सुरु करण्याबाबतची कार्यवाही केली जाईल. बाजाराचे कामकाज करण्यासाठी वेळ निश्चित करणे गरजेचे आहे. प्रशासनाने निर्णय दिल्यानंतर बाजार घटकातील अडते,व्यापारी, कामगार वर्गाबरोबर चर्चा करुन मार्केटयार्ड सुरु करण्यात येईल.