पुणे: करोनामुळे तीन दिवसांपासून बंद असलेला मार्केटयार्डातील गुळ-भुसार बाजार शुक्रवार (दि. 27) पासून सुरळीत सुरू झाला. बाजारात राज्यासह परराज्यातून 150 ते 200 ट्रक मालाची आवक झाली. यावेळी, शहरासह जिल्ह्यातील खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात किराणा साहित्यांची खरेदी केली. दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने घाऊक खरेदीलाच परवानगी दिल्याने मार्केटयार्डात गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.
करोनामुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंमध्ये गुळ-भुसाराचा समावेश असताना, देखील सुरक्षेच्या कारणास्तव पुणे बाजार समितीच्या गुळ-भुसार बाजारातील व्यवहार मंगळवार (दि. 24) पासून बंद झाले होते. व्यवहार सुरू करण्यासाठी बाजार समिती प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने देखील प्रयत्न केले. यासाठी व्यापारी व अन्य घटकांच्या सातत्याने बैठका घेत, गर्दी आणि खबरदारीच्या उपाययोजना घेण्याचा विश्वास दाखविला. अखेर, गुरुवार पासून दि. पूना मर्चंटस् चेंबरने बाजार आवार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, प्रशासनाने आदेश दिल्याने खरेदीदार, कामगार वर्गासह व्यापारी वर्गाला पोलिसांकडून सहकार्य मिळत आहे. बाजार समिती प्रशासनाकडून बाजार आवारात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. गुळ-भुसार बाजारात जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे, आगामी काळात तुटवड्याची शक्यता नाही. मार्केटयार्डातील किरकोळ विक्रीची दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे, किरकोळ ग्राहकांनी खरेदीसाठी येऊ नये .
त्यांनी, जवळच्या दुकानात खरेदी करावी असे आवाहन ओस्तवाल यांनी केले.