मार्केटयार्डजवळील रस्त्यावर “नो पार्किंग’

बाजार समितीचे प्रयत्न : वाहतूक पोलिसांशीही चर्चा

पुणे – मार्केटयार्डजवळील नेहरू आणि शिवनेरी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अनाधिकृतपणे टुरिस्ट वाहने लावण्यात येत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही रस्त्यावर “नो पार्किंग झोन’साठी बाजार समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. वाहतूक पोलिसांशी बाजार समिती प्रशासनाने प्राथमिक चर्चा केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“नो पार्किंग झोन’बद्दल पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी होणार आहे. भुसार विभागात अनधिकृतपणे वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मार्केटयार्डात दररोज शेकडो वाहनांची आवक होते. भुसार, कांदा-बटाटा, भाजीपाला अशा सर्वच विभागात असते. वाहतूक कोंडीच्या त्रासाचा परिणाम व्यापारावर होत आहे. काही प्रमाणात व्यापार घटू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरकारी आणि फळ विभागात सुकाणू समिती नेमून उपाययोजना आखण्यात आल्या. त्याद्वारे तेथील कोंडी फोडण्यात काही अंशी यश आले आहे. याच समितीच्या सूचनेनुसार मार्केटयार्ड आवारातील समस्या सोडविण्यासाठी आणखी उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यानुसार भुसार बाजारात कारवाई सुरू झाली आहे. येथील आणि शेजारच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाजार समितीकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून हे रस्ते नो पार्किंग झोन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबरोबरच भुसार विभागातील रस्ते, पाणी, वीज, अंतर्गत वाहतुक कोंडी, सर्व्हिस लेन, ड्रेनेज दुरुस्तीसारख्या विविध तक्रारी दूर करण्यासाठी भुसार विभागातील व्यापाऱ्यांची समिती स्थापन केली. त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मार्केटयार्डाशेजारी असलेल्या शिवनेरी आणि नेहरू रस्त्यावर टुरिस्ट आणि अन्य वाहनांसाठी “नो पार्किंग झोन’ करणार आहोत. यासाठी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांसोबत प्राथमिक चर्चाही झाली आहे. आणखी चर्चा करून योग्य निर्णय घेऊन नियमन करू. पुढील आठवड्यापासून याची अंमलबजावणी सुरू होईल.
– बी. जे. देशमुख, मुख्य प्रशासक, बाजर समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)