गेट क्र. 3ला वाहनांचा वेढा : सलग दोन दिवस सुटी असल्याने मोठी आवक
पुणे – शनिवार साप्ताहिक सुट्टी, रविवारी असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्केट यार्डाचे कामकाज दोन दिवस बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात तरकारी विभागात 150 ते 160 ट्रक, कांदा विभागात छोट्या-मोठ्या मिळून तब्बल 1,200 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे तीन क्रमांच्या प्रवेशद्वाराबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ही परिस्थिती सुरक्षारक्षक मात्र निवांत फिरत असल्याचे दिसून आले. तीन क्रमांकाच्या बाहेर जरी वाहतूक कोंडी होती, तरी प्रत्यक्ष मार्केट यार्डात मात्र वाहतुक व्यवस्था सुरळीत असल्याचे दिसून आले.
मार्केट यार्डात दर रविवारी मोठी आवक होते. मात्र, यावेळी प्रथमच शनिवार, रविवार अशा दोन लागून सुट्या आल्या आहेत. त्यामुळे बाजारात जास्त मालाची आवक झाली. दर शुक्रवारी साधारणपणे 100 गाड्यांची तरकारी विभागात आवक होत असते. ती आवक आज 150 ते 160 गाड्यापर्यंत पोहोचली. तर, कांद्याची साधारणपणे 100 ट्रक आवक होत होती. ती तब्बल 350 ट्रक झाली. त्यामुळे मार्केट यार्डाबाहेर वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. तीन क्रमांकाच्या प्रवेशद्वाराबाहेरील वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
याविषयी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले, “वाहतुकीच्या नियमाची येथे कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. प्रथमत: रस्त्यावर होणारे पार्किंग बंद झाले पाहिजे. ते पार्किंग दुसरीकडे झाल्यासही वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल. या भागात सकाळीच ठराविके वेळेपर्यंत वाहतुक कर्मचारी नियोजन करतात. त्यानंतर सुरक्षा विभागाकडून येथे अपेक्षेप्रमाणे काम होत नाही.’