भुसार विभाग आज, तर फळे-भाजीपाला उद्यापासून सुरू
दि.24 जुलैपर्यंत फूल बाजार मात्र बंदच राहणार
पुणे – मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभाग सोमवारपासून सुरू होणार आहे. तर, तर मंगळवारपासून फळे-भाजीपाला विभाग सुरू होणार आहे. तर, फूलबाजार शुक्रवारपर्यंत (दि. 24) बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. जिल्हा प्रशासानने दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत बाजाराचे कामकाज सुरू राहणार आहे.
वाढत्या करोना संसर्गाच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये दि.14 एप्रिलपासून बाजार समितीचे हे सर्व बाजार बंद होते. त्यानंतर हे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फळे-भाजीपाला विभाग सकाळी सुरू असला तरीही शेतकऱ्यांना रात्री बाजारात शेतीमाल आणता येणार आहे. मांजरी, मोशी, खडकी, उत्तमनगर येथील भाजीपाल्याचे उपबाजार सुरू करण्यात येणार आहेत. मोशी बाजार सोमवारपासून सुरू होणार आहे. तर, उर्वरित तीन उपबाजार मंगळवारपासून सुरू होणार आहेत.
बाजार सुरू करताना आडते, व्यापारी, कामगार संघटनांचे मत विचारात घेण्यात आले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाने बाजार सुरू करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाजार घटकातील सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
हवेली तालुक्यातही संसर्ग वाढताच
हवेली तालुक्यात रविवारी दिवसभरात 31 करोनाचे नवे बाधित आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक 14 जण हे वाघोली गावात आढळले आहेत. यामुळे तालुक्यात करोना बाधितांची एकूण संख्या 1 हजार 455 इतकी झाली आहे. यातील 565 जण करोनामुक्त झाले आहेत. रविवारी उरुळीकांचन-2, किरकटवाडी-4, कुडजे-1, नऱ्हे -8, नांदेड गाव-2 बाधित आढळले आहेत. सध्यस्थितीत हवेलीमध्ये 890 करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.