बचतगटाच्या मालाला मिळणार बाजारपेठ

नगरपालिकेचा पुढाकार : छ. शिवाजी भाजी मंडईतील दहा गाळ्यांमधून होणार विक्री

कराड – महिलांना आर्थिक सबलता येण्याच्या उद्देशाने बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचा शासनाकडून प्रयत्न करण्यात आला. त्याचा आधार घेत महिलांनी अनेक व्यवसाय उभारून प्रगतीचा मार्ग अवलंबला. मात्र जागेची उपलब्धता, मार्केटींग स्कील अपुरे असल्याने बाजारपेठेत टिकून राहणे या महिलांना शक्‍य होत नाही. त्यामुळे उत्पादन चांगले असूनही बचतगटाच्या महिला मागे पडत असल्याचे दिसते. हे लक्षात आल्याने कराड नगरपालिकेने बचतगटाच्या मालाला मॉलच्या माध्यमातून कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यासाठी अजून वर्षभर महिलांना वाट पहावी लागणार आहे.

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाद्वारे नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे नगरपालिकेच्या बचतगटांनी तयार केलेल्या विविध मालाला बाजारपेठ मिळावी. विविध प्रकारच्या एकूण 27 सेवा एकाच छताखाली देण्याच्या उद्देशाने या मॉलचे नियोजन करण्यात आले आहे. पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत शहरात एकूण 150 बचतगट आहेत. यातील अनेक बचतगटांद्वारे छोटे-मोठे व्यवसाय केले जात आहेत. तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी महिलांना मोठा आटापिटा करावा लागतो. स्थानिक बाजारातही मालाचा उठाव होत नसल्याने जिथे प्रदर्शन भरविले जातील तेथे जादा पैसे घालवून माल लावले जातात.

मात्र अनेक बाबींच्या कमतरतेमुळे आजही मेहनत व भांडवल जास्त मात्र नफा कमी अशा पध्दतीने मालाची विक्री करावी लागत आहे. गेली अनेक वर्षे हीच परिस्थिती आहे. सध्या महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविणे खूप कठीण होऊन बसले आहे. काही ना काही पर्यायी मार्ग अवलंबिणे गरजेचे आहे. हाच विचार करून महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून उभारलेल्या व्यवसायाला बाजारपेठ मिळावी अशी मागणी महिलांनी पालिकेकडे केली होती. त्यामुळे पालिकेच्या वतीने मॉलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

पालिकेने येथील भाजीमंडईमध्ये उभारलेल्या छ. शिवाजी महाराज संकुलामधील रिकामे असणारे गाळे या बचतगटांसाठी देण्यात येणार आहेत. या गाळ्यांमध्ये सर्व बचतगटांचा विविध प्रकारचा माल नाममात्र शुल्क घेवून विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. या मालाला ग्राहकांकडून जशी मागणी येईल, त्या प्रमाणात बचतगटांकडून मालाचा पुरवठा करुन महिलांना आर्थिक सबलता देण्यात येणार आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचा उद्देश नागरी गरीब लोक, त्यांच्या संस्थांना क्षमता बांधणी करणे, उपजिविकेचा विकास व नागरी दारिद्य्र निर्मूलन करणारी यंत्रणा यांची क्षमता वाढविणे, नागरी गरीब कुटुंबातील व्यक्‍तिंना उपजिविकेच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन देणे, बाजाराच्या औद्योगिक गरजेनुसार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.

नागरी गरिबांच्या लघुउद्योगांना चालना देणे आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. या मॉलच्या उभारणीसाठी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तज्ञ गणेश जाधव, गीतांजली यादव, महिला व बालकल्याण अधिकारी दिपाली रेपाळ परिश्रम घेत आहेत. मॉलच्या उभारणीनंतर बचतगटाच्या महिलांनी केलेल्या मालाचा उठाव होण्यास मदत होणार आहे.

शासनाकडून यासाठी 10 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याठिकाणी 10 गाळ्यांमधून मालाची विक्री करण्यात येणार आहे. बचतगटांनी तयार केलेल्या मालाची विभागणी करून ग्राहकांना मागणीनुसार माल देण्यात येणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार संबंधित बचतगटांना त्याची माहिती देऊन माल मागवून विक्री केली जाणार आहे. यामुळे महिलांना माल घेऊन इतरत्र कोठेही जाण्याची गरज भासणार नाही. एकाच ठिकाणी सर्व माल घेण्यात येणार आहे. तसेच या गाळ्यामधून दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून ते इलेक्‍ट्रिीक वस्तूंपर्यंत सर्व दुरुस्ती, विक्री अशी सुविधाही देण्यात येणार आहेत.

गणेश जाधव,तांत्रिक तज्ज्ञ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.