Market value of companies – रिझर्व्ह बँकेच्या मवाळ पतधोरणाबाबत आशावाद आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून वाढलेली खरेदी या कारणामुळे गुरुवारी शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्याने वाढले. गेल्या पाच दिवसापासून शेअर बाजार निर्देशांकात वाढ होत आहे. त्यामुळे पाच दिवसात भारतीय शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 15.18 लाख कोटी रुपयांनी वाढून 458 लाख कोटी रुपये म्हणजे 5.41 लाख कोटी डॉलरवर गेले.
अमेरिकेची अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे संकेत आल्यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण होते. त्यामुळे भारतीय निर्देशांकांनाही आधार मिळाला. या पाच दिवसात सेन्सेक्स 3.44 टक्क्यांनी म्हणजे 2,722 अंकांनी वाढला आहे. मेहता इक्विटीज या कंपनीचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले की, अमेरिकेतील शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेले. त्यामुळे अमेरिकेला निर्यात करणार्या भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
यामुळे शेअर बाजारात उमेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेसचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसात परदेशी गुंतवणूकदारांनी 5,000 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे आता निवडक नाही तर सर्वच कंपन्यांच्या शेअरची खरेदी वाढली असल्याचे वातावरण आहे.