‘करोना’च्या दहशतीखाली बाजारपेठ

चिनी वस्तूंचा तुटवडा; चायनीज पदार्थांचे स्टॉल रिकामे; वस्तूंच्या किंमतीही वाढल्या

पिंपरी – चीनमध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेल्या करोना व्हायरसचा प्रभाव पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेतही दिसू लागला आहे. दीड महिन्यापासून शहरातील बाजारपेठेत चीनच्या नव्या वस्तू दाखल न झाल्याने संगणक साहित्य, पेन ड्राईव्ह, लहाण मुलांची खेळणी महागली आहेत. तर मांसाहाराचा धसका नागरिकांनी घेतल्यामुळे चायनीज पदार्थांची विक्री करणारे सर्वच्या सर्व हातगाडे व हॉटेल ओस पडली आहे. याचा फटका मांसाहरी हॉटेल व्यवसायिकांना बसला असून चिकनच्या दुकानातील विक्रीही निम्म्यावर आली आहे. एकंदरीतच बाजारपेठेवर “करोना’चा परिणाम झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चीनमध्ये सध्या करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये करोनाचे बळी दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच चीनमधून येत असलेल्या सर्व प्रकारचे शिपमेंट बहुतेक सर्वच देशांनी थांबविले आहेत. यामुळे उद्योग-व्यवसाय बंद अवस्थेत आहेत. त्यातच भारत सरकारने चीनमधून होणाऱ्या संपूर्ण आयातीवर बंदी घातल्यामुळे चीनमधून होणारी आयात पूर्णपणे थांबली आहे. त्याचा परिणाम आता बाजारपेठांवर जाणवू लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चीनमध्ये वर्षाच्या सुरुवातीला महिनाभर सुट्टी दिली जाते त्यामुळे जानेवारी महिन्यातही आवक झाली नव्हती. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून एकही वस्तू भारतीय बाजारपेठेत दाखल झालेली नाही.

बाजारपेठेवर संक्रात
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पामध्ये सर्वाधिक चीनी वस्तूंची आवक होते. यामध्ये मोबाईल, सुटे भाग, संगणक, त्याचे सुटे भाग, लहाण मुलांची खेळणी, विद्युत उपकरणांसह अनेक चीनी वस्तूंची रेलचेल या बाजारपेठेत कायम पाहण्यास मिळते. मात्र गेल्या दीड महिन्यात चीनमधून कोणतीच आयात न झाल्यामुळे व्यापाऱ्यांजवळ असलेल्या बहुतांश वस्तू या संपलेल्या आहेत. तर ज्यांच्याकडे साठा आहे, त्यांनी या वस्तू चढ्या दराने विक्री करण्यास सुरुवात केल्यामुळे ग्राहकांनीही पाठ फिरविली आहे.

पिंपरी कॅम्पामध्ये किमान पन्नास टक्के वस्तू या चीनी बनावटीच्या विक्रीस उपलब्ध होत होत्या. या वस्तूच संपुष्टात आल्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल पन्नास टक़्क्‍यांवर घसरली आहे. चीनी बनावटीच्या वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या भारतीय कंपन्यांनीही या अडचणीचा फायदा घेत आपल्या वस्तूंचे दर वाढविल्यामुळे खरेदी- विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. अत्यंत गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा कल असल्यामुळे बाजारपेठेतील गर्दीही मंदावल्याचे पहावयास मिळत आहे.

चायनीजचे स्टॉल रिकामे
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक गल्लीबोळात चायनिजचे स्टॉल आहेत. एरव्ही भरभरून गर्दी असलेले हे स्टॉल आठ ते दहा दिवसांपासून ओस पडले आहेत. चायनीज स्टॉलवर चिकनचे पदार्थ उपलब्ध होतात. मात्र चिकन खाल्ल्यामुळे करोना होऊ शकतो, अशी अफवा सर्वसामान्यांमध्ये पसरल्यामुळे या स्टॉलवर खाण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. नेपाळ, पश्‍चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहारमधून आलेल्या अनेक बेरोजगारांनी चायनीजचे स्टॉल थाटले आहेत. मात्र या स्टॉलवरील विक्री थंडावल्यामुळे या स्टॉलधारकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पहावयास मिळत आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास या स्टॉलधारकांवर उपासमारीची वेळ उद्‌भवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मोबाइल, संगणक साहित्य, खेळणी महागली
पिंपरी-चिंचवड शहरातील छोट्या-मोठ्या दुकानांसह बाजारपेठांमध्ये असलेल्या चीनी बनावटीच्या सर्वच्या सर्व साहित्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फटका मोबाइल, संगणक साहित्य, सुटे भाग आणि लहान मुलांच्या खेळण्यांना बसला आहे. छोट्या विक्रेत्यांजवळील बहुतांश स्टॉक संपत आल्यामुळे आहे त्या वस्तू चढ्या दराने विक्री केल्या जात आहेत. लहान मुलांची खेळणी ही चीनी बनावटीमध्येच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. मात्र आवकच नसल्याने खेळणी बाजारावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. छोट्या दुकानांमधील स्टॉक संपुष्टात आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तर पुरवठा दारांनी दर वाढविल्याने खेळणी मागवायची की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये छोटे व्यापारी दिसून येत आहेत. अगोदरच महाग असलेली चीनी खेळणी आता आणखी महाग झाल्याने ग्राहकांनीही दुकानाकडे पाठ फिरविल्याचे पहावयास मिळत आहे.

विश्‍वासाहर्तऐवजी दर वाढविले
बाजारपेठेमध्ये करोनामुळे एकंदरीतच निरुत्साह पहावयास मिळत आहे. चीनी साहित्यांना टक्कर देणाऱ्या भारतीय बनावटीचे साहित्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी या संधीचा फायदा उठवित विश्‍वासार्हता कमविण्याऐवजी किंमती वाढवून पैसे कमविण्याकडे लक्ष दिल्यामुळे भारतीय बनावटीच्या वस्तूही महागल्या आहेत. एकंदरीतच आर्थिक उलाढाल बिघडल्याने व्यावसायिकांचे संपूर्ण गणितच बिघडू लागले आहे. करोनाच्या विळख्यातून सुटका होणार की हा विळखा आणखी घट्ट होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

“व्हॅलेंटाइन डे’ वरही परिणाम
शुक्रवारी जगभरात साजरा होत असलेल्या “व्हॅलेंटाइन डे’च्या खरेदीवरही करोनाची दहशत पहावयास मिळाली. व्हॅलेंटाईन निमित्त भेट द्यावयाच्या बहुतांश वस्तू या चीनमधून आयात होत होत्या. यावर्षी यातील एकही वस्तू उपलब्ध न झाल्यामुळे व्हॅलेंटाइन डे साजरा करणाऱ्या तरुणांच्या उत्साहावरही विरजण पडले आहे. भारतीय बनावटीच्या काही किरकोळ वस्तू खरेदीकडे तरुणांचा कल पहावयास मिळाला. मात्र अपेक्षित उलाढाल नसल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पहावयास मिळाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.