बटाटा वाणाला उठावच नाही

मंचर बाजार समितीत बाजारभाव कडाडले ः उत्पादनही घटणार

मंचर -महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बटाटा वाणांची बाजारपेठ असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांकडून विक्रीस आलेल्या बटाटा वाणाचे बाजारभाव कडाडले. बटाटा वाणाची क्विंटलला 4200 ते 5000 रुपये दराने विक्री होत आहे; परंतु बटाटा वाणाचे कडाडले बाजारभाव पाहता, तसेच झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये वाफसा नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून मात्र फारशी मागणी नसल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील बटाटा वाण विक्रीसाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणून मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. सध्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची जेवढी मागणी आहे, तेवढा बटाटा वाण उपलब्ध आहे; परंतु ऑक्‍टोबरनंतर शेतकऱ्यांची बटाटा वाणाची मागणी वाढणार आहे. त्यानंतर मात्र वाणाची कमतरता निर्माण होऊ शकते.तसेच सध्या असलेल्या बाजारभावापेक्षा जास्त भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात बटाटा वाणाची लागवड यावर्षी कमीच होण्याची
शक्‍यता आहे.

महाराष्ट्राआधी एप्रिल-मे-जून च्या पहिल्या टप्प्यात कर्नाटकमध्ये बटाट्याची लागवड केली जाते. कर्नाटकमध्ये दरवर्षी दहा लाख पोती लागवड होत असते; परंतु कोरोनामुळे यावर्षी दोन लाख पोतीच लागवड झाली. लागवड केलेल्या बटाट्यावर करपा आल्याने त्यात अजूनच घट होणार आहे. कर्नाटकमध्येही बटाटा उत्पादन घटणार आहे.

देशभर बटाटा वाणाचा पुरवठा पंजाबमधून
देशाला बटाटा वाण बियाणे हे पंजाबमधून पुरवले जाते. अनेक व्यापारी पंजाबमध्ये बटाटा काढणीनंतर बटाटा खरेदी करून साठवणूक करतात; परंतु यावर्षी करोनामुळे पंजाबमध्ये व्यापारी बटाटा खरेदी करू शकले नाही, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी बटाट्याची साठवणूक केली आहे. शेतकऱ्यांना बटाटा वाणाला पन्नास रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळेल,अशी आशा असल्याने त्यांनीही बटाटा बियाणे विक्रीस काढले नाहीत.

दक्षिण भारतातही बटाट्याचा तुटवडा
गेल्या वर्षी दक्षिण भारतात बटाट्याची लागवड कमी झाली. त्यामुळे दक्षिण भारतातही बटाटा शिल्लक नाही. मागील तीन वर्षे ज्या शेतकऱ्यांनी दक्षिण भारतात बटाटा साठवला, त्यांना तोटा झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी बटाट्याची साठवणूक केली नाही. येथील शेतकऱ्यांनी बटाट्याऐवजी इतर पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. तसेच जानेवारी फेब्रुवारीमध्ये बटाटा काढणीनंतर तिकडे बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बटाटा विकून टाकला, त्यामुळे सर्वत्र बटाट्याचा तुटवडा आहे.

राज्यासह परराज्यांतून वाण विक्रीसाठी दाखल
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, नांदेड, नाशिक, जालना, लातूर, औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्ये बरेच शेतकरी बटाटा बियाणे खरेदी करण्यासाठी येथे येतात. पंजाब, हरियाणा, हिमाचल, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतून पंधरा दिवसापूर्वी बटाट्याचे वाण मंचर मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाले असून, दहा गाड्य बटाटा वाणाची आवक झाली आहे यातील पाच गाड्‌यांची विक्री झाली आहे, तर पाच गाड्या शिल्लक आहेत.

महाराष्ट्रात बटाटा वाणाला दरवर्षीपेक्षा जास्त भाव असल्याने याचा परिणाम लागवडीवर होऊन लागवडीत 30 ते 40 टक्‍के घट होणार आहे. सद्यःस्थितीत गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड मुसळधार पावसाने लागवड केलेला बटाटा काही प्रमाणात सडला तर पुढे लागवड करण्यासाठी उत्सुक असणारे शेतकरीही पावसाच्या भीतीमुळेमुळे थांबला आहे. भविष्यात पावसाने उघडीप दिल्यास बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे.
– देवदत्त निकम, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर

बटाटा वाणाला सध्या जास्त बाजारभाव असल्याने शेतकरी बटाटा लागवड करण्यास टाळाटाळ करीत आहेत. मागील सहा महिन्यापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्रच शेतीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. यामुळे बटाटा वाणांचेही बाजारभाव वाढले असून मागील काही वर्षांत यावेळी प्रथमच बटाटा वाणाचे बाजारभाव सर्वाधिक कडाडले आहेत.
– संजय मोरे, व्यापारी, मंचर

Leave A Reply

Your email address will not be published.