मुंबई – जीआर इन्फ्रा या कंपनीच्या आयपीओला गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या शेअरची शेअर बाजारावर आज नोंदणी झाली. बाजार सुरु होताना आज कंपनीच्या शेअरचा भाव 109 टक्क्यांनी वाढून 1,746 रुपयावर गेला. या कंपनीने उपलब्ध केलेल्या शेअरला 102.8 पट मागणी गुंतवणूकदारांनी केली होती.
उदयपूर येथे कार्यरत असलेली ही कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये काम करते. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येते.
क्लीन सायन्स
विशेष प्रकारची रसायने तयार करणाऱ्या क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कंपनीच्या आयपीओला गेल्या आठवड्यामध्ये गुंतवणूकदारांनी असाच चांगला प्रतिसाद दिला होता. आज या आयपीओची शेअर बाजारावर नोंदणी झाली. त्यावेळी शेअरच्या मूळ किमतीमध्ये तब्बल 98 टक्क्यांची वाढ झाली आणि शेअर 1,784 रुपये प्रति शेअर या भावाने नोंदला गेला.
कंपनी विविध रसायनाचा पुरवठा देशातील व परदेशातील कंपन्यांना करते. त्यामुळे आगामी काळात कंपनीचा नफा आणि उलाढाल वाढेल. या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येते.