फळे, भाजीपाला विभाग सुरू करण्याबाबत बाजार घटक सकारात्मक

गुरूवारी निर्णय होणे अपेक्षित

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग सुरू करण्यासाठी बाजार घटक सकारात्मक आहेत. गुरूवारी (दि. 28) बाजार समिती प्रशासन आणि आडते, कामगार संघटनांची पुन्हा बैठक होणार आहे. कोणत्या उपाययोजनाचा अंमल करून आणि कधीपासून बाजार सुरू होणार, याबाबतचा निर्णय यावेळी होणार असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.

करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग 10 एप्रिलपासून बंद ठेवण्यात आला आहे. गुळ-भुसार विभाग सुरू होता. दरम्यान, काही व्यापाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने 19 मेपासून हा विभाग बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी, बाजार समिती प्रशासन आणि दि पुना मर्चंट्‌स चेंबरच्या बैठकीनंतर सोमवारपासुन (दि.25) गुळ-भुसार बाजार सुरू झाला आहे.

आता बाजार समिती प्रशासनाकडून फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा हे विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना माल विक्री करण्यासाठी बाजारपेठ हवी आहे. तर, ग्राहकांनाही फळे, भाजीपाला हवा आहे.

या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती प्रशासन, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन, कामगार युनियन, टेम्पो आणि तोलणार संघटनांची बैठक झाली. यामध्ये बाजार सुरू करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. बंद होण्यापूर्वी एक दिवस फळ आणि एक दिवस भाजीपाला अशा पध्दतीने बाजार सुरू होता. आता त्याच पध्दतीने ठेवायचा का, इतर पध्दतीने सुरू करायचा, जेणेकरून बाजार आवारात येणाऱ्यांना सर्वच प्रकारचा माल एखदाच खरेदी करता येईल. याबाबत निर्णय होणार आहे.

सोशल डिस्टेनिंगचे पालन कसे करायचे, किती गाड्यांना प्रवेश द्यायचा, सुरक्षिततेचे आणखी कोणते उपाय करायचे, यावर गुरूवारी होणाऱ्या बैठकीत पुढील निर्णय होईल

Leave A Reply

Your email address will not be published.