भोर – शहरात होत असलेली रोजची वाढती गर्दी कमी व्हावी आणि करोना व्हायरसला प्रतिबध व्हावा, या उद्देशाने भोर शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी मेडिकल व किराणा भुसार मालाची दुकाने सोमवार ते शनिवार या सहा दिवशी सकाळी 9 ते 12 या वेळेतच उघडी ठेवली जाणार असून, या सहा दिवसांची आचारसंहिता तयार करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार तथा आपत्कालिन समितीचे अध्यक्ष अजित पाटील व मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली आहे.
या विषयीची अधिक माहिती देताना तहसीलदार व मुख्याधिकारी म्हणाले की, या ठरवलेल्या आचारसंहितेनुसार भोर शहरातील शहरदूत व ग्रामीण भागातील ग्रामदूतांनाच बाजारपेठेत वाहन व त्याच्या चालकासह परवानगी देण्यात आली आहे.
याकामी भोर पोलिसांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या असून, भोर शहरात पोलीस निरीक्षक राजू मोरे व उपपोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात प्रवेश करणाऱ्यांची ते कसून चौकशी करत आहेत. विनाकारण कोणीही बाजारपेठेत प्रवेश केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.
वारानुसार गावांचे नियोजन
सोमवार – महुडे व वेळवंड खोऱ्यांतील 28 गावे
मंगळवार – आंबवडे खोऱ्यातील 27 गावे
बुधवार – भुतोंडे व रायरी खोऱ्यातील 40 गावे
गुरुवार – हिर्डोशी खोऱ्यातील 22 गावे
शुक्रवार – पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री ते किकवी, सारोळा व पुर्वेकडील अशी 20 गावे
शनिवार – भोर शहर व वीसगांव खोऱ्यांतील 20 गावे आणि
ऊत्रौली, भोलावडे व वडगांव डाळ आदी गावे.